पुणे- एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादुगारीमुळे लोकशाहीचे आणि देशाचे नुकसान होत आहे, त्यांच्या ‘जादू’ तून बाहेर पडा असे आवाहन भारतीयांना केले.असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, दिल्लीत बसून एक ‘जादूगार’ जादूचे प्रयोग करत आहे, ज्यामुळे लोकशाहीचे नुकसान होत आहे. त्यांच्या धोरणांमुळे मिलेनियल्स आणि जेनझी या दोन पिढ्या बरबाद होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भविष्यात या पिढ्यांना त्यांच्या चुका लक्षात येतील, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल, असेही ते म्हणाले.पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या या वार्तालाप समयी ते बोलत होते यावेळी संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.
युवकांना योग्य शिक्षण आणि नोकऱ्या मिळत नसून, त्यांना पेपरफुटी, पूल कोसळणे आणि भ्रष्टाचारासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे ओवेसींनी नमूद केले. श्रीमंत अधिक श्रीमंत होत असून गरीब अधिक गरीब होत आहेत. देशातील ६५ टक्के नागरिक ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे असून, सध्या त्यांना ‘जादूगार’ आकर्षित करत असले तरी, भविष्यात जेव्हा हे युवक प्रश्न विचारतील, तेव्हा परिस्थिती कठीण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्यावरही ओवेसींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत व्यापार, पाणी आणि सीमा बंद केली, तरीही क्रिकेट सामना खेळवला गेला, ज्यामुळे पाकिस्तानला आर्थिक फायदा झाला, असे ते म्हणाले. क्रिकेट सामना जिंकल्यावर पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर ३.०’ असे म्हटले, यावर त्यांनी आक्षेप घेतला. शहीद जवानांच्या बलिदानाची तुलना क्रिकेट सामन्याशी करता येणार नाही, असे सांगत, भारतीय लष्कराला निधीची गरज आहे का, असा सवालही त्यांनी केला. लष्करासाठी निधी गोळा करण्याची वेळ आल्यास आपण पुण्यातून त्यापेक्षा जास्त निधी जमा करू, असेही ओवेसी म्हणाले.

