मुंबई, 30 सप्टेंबर 2025
भारतीय टपाल खात्याने स्पीड पोस्ट ही सेवा ०१ ऑगस्ट १९८६ रोजी सुरू केली. देशभरातील पत्रे व पार्सल जलद व विश्वासार्ह पद्धतीने पोहोचविण्याच्या उद्देशाने ही सेवा आरंभ करण्यात आली. इंडिया पोस्टच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुरू झालेल्या या सेवेमुळे वेळेत, कार्यक्षम व सुरक्षित पद्धतीने मेल वितरण शक्य झाले. कालांतराने स्पीड पोस्ट ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि विश्वासार्ह टपाल सेवा ठरली असून खाजगी कुरिअर कंपन्यांना समर्थपणे टक्कर देत आहे.
आरंभापासूनच स्पीड पोस्टने ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा केल्या आहेत. देशातील पसंतीची वितरण सेवा म्हणून स्थान अधिक दृढ करण्यासाठी आता या सेवेत खालील नव्या सुविधा समाविष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विश्वसनीयता, सुरक्षा आणि ग्राहकसुविधा आणखी वाढतील:
- ओटीपी–आधारित सुरक्षित वितरण
- ऑनलाईन पेमेंट सुविधा
- लघु संदेशाद्वारे (एसएमएस) वितरण सूचना
- सोयीस्कर ऑनलाईन बुकिंग सुविधा
- रिअल टाईम वितरण माहिती
- ग्राहक नोंदणीची सुविधा
इनलॅंड स्पीड पोस्ट पत्र पाठविण्याचा दर ऑक्टोबर २०१२ मध्ये सुधारित करण्यात आला होता. सातत्याने सुधारणा घडवून आणणे, वाढत्या कार्यकारी खर्चाची पूर्तता करणे आणि नवीन नवोन्मेषात गुंतवणूक करण्यासाठी स्पीड पोस्ट चे दर आता तर्कसंगत रीतीने पुनर्निर्धारित करण्यात आले आहेत. सुधारित दर ०१ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होतील, याबाबतची अधिसूचना गॅझेट नोटिफिकेशन क्र. 4256 दि. 25.09.2025 द्वारे जारी करण्यात आलेली आहे.
सुधारित दर संरचना पुढीलप्रमाणे आहे:
| वजन / अंतर | स्थानिक | 200 कि.मी. पर्यंत | 201–500 कि.मी. | 501–1000 कि.मी. | 1001–2000 कि.मी. | 2000 कि.मी. पेक्षा जास्त |
| ५० ग्रॅमपर्यंत | 19 | 47 | 47 | 47 | 47 | 47 |
| ५१ – २५० ग्रॅम | 24 | 59 | 63 | 68 | 72 | 77 |
| २५१ – ५०० ग्रॅम | 28 | 70 | 75 | 82 | 86 | 93 |
स्पीड पोस्ट अंतर्गत मूल्यवर्धित सेवेत ‘नोंदणी’ (रजिस्ट्रेशन) ची सुविधा देखील उपलब्ध आहे. ही सेवा कागदपत्रे व पार्सल दोन्हींसाठी लागू आहे. ग्राहकांना प्राप्तकर्त्यासाठी विशेषतः पत्यामध्ये दिलेल्या प्राप्तकर्त्यास सुरक्षित वितरणाची सुविधा मिळेल, जी विश्वास व गती यांचा संगम घडवून आणण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे. प्रत्येक स्पीड पोस्ट वस्तूसाठी (कागदपत्र/पार्सल) ₹ ५/- इतका नाममात्र शुल्क तसेच लागू असलेला जीएसटी आकारला जाईल. ‘नोंदणी’ या मूल्यवर्धित सेवेअंतर्गत संबंधित वस्तू केवळ प्राप्तकर्त्यास किंवा त्याने विधिवत अधिकृत केलेल्या व्यक्तीसच सुपूर्द केली जाईल.
याचप्रमाणे, ‘वन–टाईम पासवर्ड (ओटीपी) डिलिव्हरी’ या मूल्यवर्धित सेवेअंतर्गत देखील प्रत्येक स्पीड पोस्ट वस्तूसाठी (कागदपत्र/पार्सल) ₹ ५/- तसेच लागू जीएसटी आकारला जाईल. या सुविधेत वितरण कर्मचारी प्राप्तकर्त्यास दिलेला ओटीपी यशस्वीरीत्या पडताळल्या नंतरच वस्तू सुपूर्द केली जाईल.
विद्यार्थ्यांसाठी स्पीड पोस्ट सेवांची उपलब्धता वाढविण्यासाठी, स्पीड पोस्ट दरांवर १०% सवलत देण्यात आली आहे. याशिवाय, नवीन मोठ्या ग्राहकांसाठी विशेष ५% सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सर्व उपक्रमांचा उद्देश इंडिया पोस्टला अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञान–सक्षम सेवा प्रदाता म्हणून विकसित करणे हा आहे. शाश्वत नवोन्मेष व विश्वास दृढ करणाऱ्या सुविधांची अंमलबजावणी करून, स्पीड पोस्ट ग्राहकांच्या बदलत्या गरजेनुसार स्वतःला अनुकूल करत राहील आणि देशातील सर्वात विश्वासार्ह व परवडणारा वितरण भागीदार म्हणून आपले स्थान पुनःप्रस्थापित करील.

