मराठी अभिजात दर्जा वर्षपूर्ती : महापालिकेतर्फे गाणी, गोष्टी, प्रवचन,
कविसंमेलन आणि अभिवाचन
पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे महानगरपालिका, सांस्कृतिक केंद्र आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर अभिजात मराठीचा’ हा गाणी, गोष्टी, प्रवचन, कविसंमेलन आणि अभिवाचन यांचा संगम असलेल्या विशेष कार्यक्रमाचे शुक्रवार, दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात होणार असून पुस्तक प्रदर्शन व कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10:30 वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. बालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते ल. म. कडू, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे, डॉ. संगीता बर्वे, राजीव तांबे तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., एम. जे. प्रदीपचंद्रन, ओमप्रकाश दिवटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक आणि महापालिका सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेश कामठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमाचे संयोजन संवाद, पुणेचे सुनील महाजन करीत आहेत. मराठी भाषेचा जागर करणारा हा उत्सव सर्वांसाठी खुला आहे.
छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, मनपा शाळा क्र. 47 कोथरूडच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 10 ते रात्री 10 या वेळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचे नियोजन मुख्याध्यापिका ज्योती मानकर करीत आहेत.
सकाळी 10 वाजता मराठी बालसाहित्य मेळावा व उद्घाटन सत्र आयोजित करण्यात आले आहे. यात महाराष्ट्र गीत, राज्यभाषा नृत्य, काव्यवाचन, अभिवाचन, भाषा विषयी मुलांचे मनोगत असे कार्यक्रम होणार आहेत.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशताब्दी सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘माझ्या मराठीची बोलु कौतुकें, परि अमृतातेहि पैजासी जिंके’ या विषयावर दुपारी 12 वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ह. भ. प. चैतन्य केशवराव लोंढे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
दुपारी 2 वाजता ‘नाच गं घुमा’ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मंगळागौर, भोंडला या पारंपरिक खेळांबरोबरच स्त्री शक्तीचा रंगोत्सव, ऋतूप्रमाणे येणारे सण, संस्कृतीचे रंग उलगडणारी गाणी, नृत्य आणि खेळांचा यात समावेश आहे.
सायंकाळी 5 वाजता मराठी हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अंजली ढमाळ, प्रकाश होळकर, प्रशांत मोरे, नितीन देशमुख, नारायण पुरी, भरत दौंडकर, अनिल दीक्षित, गुंजन पाटील यांचा समावेश आहे.
युवा पिढीला मराठी साहित्याची ओळख करून देत साहित्य वाचनाची गोडी लावणारा मराठी गाणी, कविता, विनोद यांच्या सादरीकरणाचा ‘अक्षरगाणी’ हा कार्यक्रम पार्श्वगायक त्यागराज खाडिलकर आणि दीपिका जोग सादर करणार आहेत.
रात्री 9 वाजता पु. ल. देशपांडे आणि सुनीतबाई देशपांडे यांच्यातील संवादांवर आधारित असलेला ‘प्रिय भाई : एक कविता हवी आहे’ हा रूपक निर्मित कार्यक्रम सादर होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे, अमित वझे, मानसी वझे, अंजली मराठे, निनाद सोलापूरकर, पार्थ उमराणी यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाची संहिता आणि रंगावृत्ती डॉ. समीर कुलकर्णी यांची असून दिग्दर्शन अमित वझे यांचे आहे तर संगीत दिग्दर्शन निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य, अपर्णा केळकर यांचे आहे. चित्रे प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांनी रेखाटलेली आहेत.
शुक्रवारी ‘जागर अभिजात मराठीचा’
Date:

