महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२५- शहरातील साळुंके विहार येथील आर्मी वेलफेअर सहकारी गृहनिर्माण संस्थेने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सोसायटीच्या छतावर ३६५ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारुन विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे दिशेने पाऊल टाकले आहे. या प्रकल्पाचा महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
महावितरण १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पर्व राबवित आहे. त्यानिमित्ताने मंगळवारी (दि. ३०) साळुंके विहार येथील आर्मी वेलफेअर सोसायटीच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे यांचेसह गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन ब्रिगेडियर एस.टी. नटराजन, सचिव कर्नल बी.डी. शिंदे, व्यवस्थापक ले. कर्नल बी.सी. जोगळेकर, तांत्रिक सदस्य कर्नल आर. मनोहरन, महावितरणचे अति. कार्यकारी अभियंता निलेश रोहनकर, राजेंद्र भुजबळ, किशोर शिंदे, सहा. अभियंता रमाकांत गर्जे व वीज कर्मचारी उपस्थित होते.
महावितरणच्या रास्तापेठ विभागांतर्गत सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची साळुंके विहार येथे ३३ एकर क्षेत्रात विस्तीर्ण अशी गृहनिर्माण संस्था आहे. या ठिकाणी ८६७ वीज जोडण्या आहेत. यात ७४६ घरगुती तर इतर १२१ जोडण्यांचा समावेश आहे. सूर्यघर योजनेत १०७ वैयक्तिक ग्राहकांनी त्यांच्या छतावर ३१० किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प बसविले आहेत. तर पाणीपुरवठ्याचे ४५ किलोवॅट व पथदिव्यांसाठी १० किलोवॅट असा एकूण ३६५ किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प या संस्थेने साकारला आहे. उर्वरित ग्राहकही लवकरच सौर ऊर्जेकडे वळणार आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता काकडे म्हणाले, ‘सैन्यदलातील या सोसायटीने हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकले असून, ते इतरांना प्रेरणा देणारे आहे. येणाऱ्या काळात या संस्थेने विजेच्या बाबतीत पूर्णत: स्वावलंबी व्हावे. यासाठी उर्वरित इमारतींच्या छतावरही सौर प्रकल्प बसविण्यास प्राधान्य द्यावे. याकामी महावितरण सर्वोतोपरी सहकार्य करेल.’
टीओडी मीटरमुळे दिवसा वापरलेल्या विजेपोटी ८० पैसे प्रतियुनिटची सवलत मिळते. त्यामुळे गृहनिर्माण संस्थेतर्फे अध्यक्ष नटराजन व तांत्रिक सदस्य आर. मनोहरन यांनी थ्री फेज व टीओडी मीटर बसविण्याची मागणी केली. तेंव्हा मुख्य अभियंता काकडे यांनी तातडीने मीटर बदलण्यासह आवश्यक देखभाल दुरुस्तीचे कामे करणे तसेच वीजभार वाढविण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या.
· सरिता वैभव सोसायटीच्या छतावर १०९ किलोवॅटचा सौर प्रकल्प
महावितरणच्या पर्वती विभागातील सिंहगडरोड दत्तवाडी शाखेंगतर्गत सरिता वैभव हाऊसिंग सोसायटीच्या ४३ सदस्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान सूर्यघर योजनेतून १०९ किलोवॅटचा सौर प्रकल्प साकारला आहे. महावितरण रास्तापेठ मंडलाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवारी (दि. ३०) करण्यात आला. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश फलके, अति. कार्यकारी अभियंता उमेश कवडे, मंगेश केंद्रे यांचेसह सोसायटीचे चेअरमन मनोज जोशी, सचिव अमेय जोशी, श्रीकृष्ण बापट, अमित कळसूर, उपेंद्र काळे यांची उपस्थिती होती. आता ही सोसायटी विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहे.

