पुणे-
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गांधी भवन, कोथरूड येथे आठ दिवसांचा ‘गांधी सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे यंदाचे १४वे वर्ष आहे. याचे उद्घाटन बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सांय. ५.३० वाजता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होईल. यावेळी ‘नागरिकांची संविधानिक कर्तव्ये’ या विषयावर न्या. ओक यांचे व्याख्यान होईल. सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. कुमार सप्तर्षी याचे अध्यक्षस्थान भूषवतील.
सप्ताहात गांधी जयंतीच्या दिवशी ‘शांती मार्च’, दररोज सायंकाळी ६ वाजता नामवंतांची व्याख्याने, तसेच ‘चित्रपट कसे बघावेत?’ यावर अभ्यासक सुहास किर्लोस्कर यांचे दृक्-श्राव्य चित्रफितींसह व्याख्यान, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची प्रकट मुलाखत आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांचे व्याख्यान असे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना आवर्जून यावे, असे आवाहन संयोजक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले आहे.

