पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १११ प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता देऊन दीड वर्ष झाले. पण नियमांच्या काही अडचणी आल्या आहेत. या सगळ्यांवर मात करून महिन्याभरात प्राध्यापकांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लागेल,” अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२६व्या पदवीप्रदान सोहळ्यात पाटील बोलत होते. या वेळी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे, सुवर्णपदके देण्यात आली.
पाटील म्हणाले, ”विद्यापीठाच्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) मानांकनासाठी तेवढा एकच निकष असतो का? विद्यापीठांच्या क्रमवारीबाबत मुख्यमंत्रीही चिंतेत पडले आहेत. या मूल्यांकनात वेगवेगळे २० निकष आहेत. त्यातील एक विद्यापीठाबद्दलचा ‘समज’ (परसेप्शन) आहे. मी ही विद्यार्थी चळवळीतून आलो आहे. विद्यार्थी, प्रश्न, आंदोलन या विरोधात मी नाही.
पण आंदोलनांचे स्वरूप कसे असावे, समन्वयाने प्रश्न सोडवता येतील का, याबाबत विद्यापीठानेही प्रयत्न करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कधी आंदोलने झालीच नाहीत. याचे कारण रयतेला काय हवे आहे, हे त्यांना आधीच कळायचे. त्यामुळे विद्यापीठालाही ते समजायला हवे. सोशल मीडियातून देशभर आणि जगभर काय संदेश जातो, याचाही विचार केला पाहिजे. या विद्यापीठात सतत आंदोलनेच होत आहेत, तर देशातील विद्यार्थी विद्यापीठात कशाला येतील?”
एखाद्या प्रश्नाबाबत किती आक्रमक व्हायचे हे जनतेलाही कळले पाहिजे ना! विद्यापीठात आंदोलकांच्या शिष्टमंडळाने येऊन संबंधितांशी एकदा-दोनदा चर्चा करावी. तरीही, मार्ग नाही निघाला तर आम्हीदेखील आहोत ना, असा सल्ला पाटील यांनी दिला.
विदेशातील विद्यार्थी आपल्याकडे येण्यासाठी आपण एक संस्था नियुक्त केली. त्याचा उत्तम परिणाम दिसून आला आहे. परदेशातून विद्यार्थी आल्यानंतर ते टिकायलाही हवेत. त्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे, तसेच प्राध्यापक भरती, विद्यापीठाला निधी मिळावा, यासाठी प्रयत्न व्हावेत. औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) यातून निधी मिळविण्यासाठी मदत करण्यात येईल.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

