पुणे -एकीकडे कचरावेचकांचे काम व आरोग्य जपण्याचे आश्वासन देणाऱ्या विश्वास २०२५ या घंटागाडी आधारित कचरा संकलन मॉडेलचा प्रचार करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या घंटागाडीची धडक बसल्याने सहकारनगर भागात काम करणाऱ्या स्वच्छ च्या कचरावेचक संगीता जाधव (वय ४५) यांना हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या हाताला टाके घालण्याची गरज आहे व डाव्या गुडघ्याला गंभीर जखम झाली आहे. या घटनेमुळे महानगरपालिकेच्या घंटागाडीवर आधारित कचरा संकलन पद्धत ‘विश्वास २०२५’ मोहिमेवर ‘विश्वास’ कसा ठेवायचा हा प्रश्न कचरावेचकांना पडला आहे.
घरोघरी जाऊन कचरा घेतल्यानंतर मनपाच्या घंटागाडीला कचरा दिल्यानंतर त्याच गाडीची धडक जाधव यांना बसली. “गाडीला कचरा दिल्यानंतर मी उलट दिशेने चालत निघाले आणि अचानक घंटागाडी रिव्हर्स घेत माझ्या दिशेने आली व काही कळायच्या आत मला गाडीचा मोठा धक्का लागला व मी गाडीखाली पडले. नशीब माझ्या पूर्ण शरीरावरून गाडीचे चाक गेले नाही, पण माझ्या डाव्या हातापायावरून गाडी गेली. लगेचच स्थानिक नागरिक व गाडीच्या ड्रायव्हरने मला गाडीखालून ओढून बाहेर काढले व प्रथमोपचारासाठी दवाखान्यात नेले.”, असे जाधव यांनी सांगितले.
या अपघातानंतर जाधव यांच्या हाताला चार टाके घालण्याची गरज आहे व त्यांच्या गुडघ्याला आणि छातीला देखील गंभीर इजा झाली आहे. विश्वास 2025 या घंटागाडी मॉडेल मुळे जाधव यांच्यासारख्या कचरावेचकांचे आरोग्य जपले जाईल व काम सोपे होईल असा दावा महानगरपालिकेतर्फे सातत्याने केला जात आहे. परंतु, प्रत्यक्षात गाड्यांमुळे कचरावेचकांच्या केवळ कामालाच नाही तर जीवालाही धोका निर्माण होत असल्याचे आशा घटनांमधून स्पष्ट होत आहे.
स्वच्छ च्या बोर्ड मेंबर विद्या नाईकनवरे म्हणाल्या, “मनपाच्या घंटागाड्यांना मागच्या बाजूला असलेल्या 5 फूट उंचीच्या टिपरला कचऱ्याने भरलेल्या जड बादल्या दररोज उचलून देताना कचरावेचकांचे शारीरिक कष्ट वाढत आहेत.
आम्हाला अशा अपघातांचा सामना करावा लागत आहे तेव्हा या नव्या विश्वास मोहिमेवर कचरावेचकांनी विश्वास तरी कसा ठेवायचा? महानगरपालिकेला आमचे आरोग्य खरंच जपायचे असेल तर आम्हाला करारानुसार महानगरपालिकेने वेळच्या वेळी हातमोजे, रेनकोट, चपला, साबण इ. साहित्य द्यावे. गाडींवर मदतीसाठी बिगारी असावेत. आम्ही नागरिकांना दारोदार जी सेवा देतो तिला अधिक सक्षम करावे. आमच्या कामाला आणि आरोग्याला धोका निर्माण होत असेल, नागरिकांना सोयीची सेवा मिळणार नसेल तर शहरासाठी ही विश्वास नाही विश्वासघात मोहीम ठरेल.”
कचरावेचकांना त्यांच्या सद्यस्थितीतील कामामध्ये त्रास होतो अशी मांडणी करणारा व्हिडिओ मनपाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून प्रसारित केला. या व्हिडिओ मधील कचरावेचक नंदा आल्हाट यानी हा व्हिडिओ कसा बनवण्यात आला याविषयी सांगितले, “कसलीही माहिती न देता मला विचारण्यात आले तुम्हाला काय त्रास होतो आणि व्हिडिओ घेतला. मी सांगितले होते की महानगरपालिकेच्या गाडीवर मदत करायला बिगारी नसल्याने आम्हाला जड बादल्या उचलून द्याव्या लागतात, ज्यामुळे कंबरदुखी, खांदेदुखी सारखे त्रास होतात. माझ बोलणं अर्धवट दाखवून कचरावेचकांना घंटागाडीवर काम करणे सोपे आहे असं सांगितलं. घंटागाडीवर काम करणे महिला कचरावेचकांसाठी कधीही सोयीचे नसेल.”
शहरात घंटागाड्यांची संख्या हजारोने वाढली तर कचरावेचकांना गाड्यांवर काम करताना अशा अपघातांचा सामना नेहमीच करावा लागेल. ही बाब पुण्यातील स्वच्छ च्या 4000 कचरावेचकांची काळजी वाढवणारी आहे. आणि रस्त्यांवर ट्रॅफिक वाढवून असे अपघात भविष्यात नागरिकांसोबतही होऊ शकतील अशी देखील भीती आहे.

