समर्थ प्रतिष्ठानचा २६ वा वर्धापन दिन सोहळा : चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ यांची उपस्थिती
पुणे : समर्थ प्रतिष्ठानच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त समर्थ गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना प्रदान करण्यात येणार आहे. गुरुवार, दि.२ आॅक्टोबर रोजी नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृह येथे पुरस्कार वितरण आणि विविध संस्थांना मदतनिधी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक पुनीत बालन हे असणार आहेत. तर, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा १६ वे वर्ष आहे. रुपये ११ हजार रोख, सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
गडचिरोली येथील नक्षलवादी भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुण्यातील आदर्श मित्र मंडळ उदय जगताप यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत आहे. नक्षलवाद्यानी दिलेली गांधी विचारांची अहिंसावादी परिक्षा आणि स्वातंत्र्यानंतर ५०० घरात व ५ शाळेत पहिल्यांदाच अश्या दुर्गम भागात सौरऊर्जा द्वारे वीज उपलब्ध करून देणे यांसह नक्षलवादी यांच्या विधवा महिलांना रोजगार निर्मिती, इ लर्निंग शाळा ,टू व्हीलर अॅम्ब्युलन्स, मुलांसाठी खेळाचे साहित्य. अशा विविध माध्यमातून कार्य करून तेथील लोकांना जगताप यांनी शांततेचा संदेश दिला आहे. पुण्यातील आदर्श गणपती मंडळाचा कार्यकर्ता गडचिरोलीत काम करतोय हीच खरं खूप हिमतीची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना यंदा गौरविण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे सर्व साहित्य वाहून गेले आहे, त्यासाठी खारीचा वाट म्हणून माढा तालुक्यातील लव्हे या गावातील १४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. याशिवाय वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान जीर्णोद्धार करिता रुपये ७५ हजार, हिरामण बनकर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदत म्हणून रुपये रुपये ११ हजार, पुणे विद्यार्थी गृह संस्थेला रुपये ११ हजार अशा देणग्या देण्यात येणार आहेत. आजपर्यंत समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने १ कोटी ३० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच वर्धापनदिनानिमित्त नटरंग अकॅडमी यांचे वतीने सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे.

