पुणे, दि. २९ सप्टेंबर, २०२५ मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारमध्ये प्रमुख पदांवर महिलांना संधी दिली आहे. राज्याच्या मुख्य सचिव पदांसह अनेक विभागांच्या अपर मुख्य सचिव महिलाच आहेत. विजेच्या क्षेत्रांत तर महिला आघाडीवर आहेत. कारण महिला घर सांभाळून ऑफिस सुद्धा तितक्याच ताकदीने सांभाळतात. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडतात. तेंव्हा महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे आरोग्य सांभाळून केले पाहिजे असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी आज पुणे येथे केले.
गणेशखिंड पुणे येथील महावितरणच्या प्रकाशभवन येथे सोमवारी ( दि. २९) दुपारी आयोजित ‘सन्मान सौदामिनींचा’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नवरात्रानिमित्ताने स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी महावितरण पुणे परिमंडलाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे तर मुख्य अभियंता सुनिल काकडे व धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अमित कुलकर्णी, विजयानंद काळे, संजीव नेहते व अनिल घोगरे, यांचेसह सर्व महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना ऊर्जा राज्यमंत्री सौ. बोर्डीकर म्हणाल्या, ‘ महिलांना त्यांच्या घरातून जर चांगले वातावरण मिळाले तर त्या अधिक कार्यक्षमतेने काम करु शकतात. विजेसारख्या जोखमीच्या क्षेत्रात महिलांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तसेच त्यांना त्यांच्या वैयक्तिक अडचणींवरही मात करावी लागते. मात्र महावितरणने महिला कर्मचाऱ्यांना अतिशय चांगले वातावरण तयार करुन दिले आहे. म्हणूनच महिला पुरुषांप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अशावेळी महिलांनीही स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन ग्राहकसेवेसाठी तत्पर राहावे.’
कार्यक्रमात ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या हस्ते उपस्थित महिला कर्मचाऱ्यांचा पुस्तक व गुलाबपुष्प देऊन प्रातिनिधीक स्वरुपात गौरव करण्यात आला. तर वर्षा कारंडे, भक्ती जोशी, स्वागती सोळंकुरे व पूजा मेश्राम या महिला कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत महावितरणमध्ये महिला कर्मचारी करत असलेल्या कामांवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन दिपश्री सरोदे व सोनाली राठोड-चव्हाण यांनी केले. याप्रसंगी महिला कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

