संविधान व लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी दीक्षाभूमी ते सेवाग्राम संविधान सत्याग्रह पदयात्राचा शुभारंभ.
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, मविआचे नेते व स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा पदयात्रेत सहभाग.
मुंबई/नागपूर, दि २९ सप्टेंबर २०२५.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आमचे निवेदन जाहिरपणे सांगितलेले आहे. निसर्ग, नियती त्यांना सुबुद्धी देवो ही प्रार्थना करत आहे. दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते ते एका व्यक्तीचे नाही तर प्रवृत्तीचे दहन असते. संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे अशी आमची अपेक्षा आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
नागपूर येथील दीक्षाभूमीवरून सकाळी ६ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धव सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्यागग्रह पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व माजी मंत्री नसीम खान, सुनिल केदार, अनिस अहमद, राजेंद्र मुळक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, खा. नामदेव किरसान, खा. शामकुमार बर्वे, आमदार अभिजीत वंजारी, शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नाना गावंडे, किशोर कान्हेरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, नागपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अश्विन बैस, संदेश सिंघलकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, संविधानाला अभिप्रेत असलेल्या भारतासाठी हातात हात घालून सर्वभारतीयांनी काम करावे आणि संविधानाचे सत्य सर्वदूर पसारावे हाच या पदयात्रेमागचा हेतू आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपाच्या एका प्रवक्त्याने छातीत गोळ्या घालण्याची जाहीर धमकी दिली आहे त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या छातीत गोळ्या घालणारी औलाद अजून जिवंत असून हा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काळ्या टोपीतून आला आहे परंतु राहुल गांधींच्या केसाला जर धक्का लावाल तर याद राखा असा इशारा काँग्रेस प्रवक्ते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
यावेळी तुषार गांधी म्हणाले की, लोकशाही व संविधान व लोकांच्या सत्याग्रहाचा अधिकार यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून हा जनतेचा आक्रोश आहे. या पदयात्रेत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते पदाधिकारी व सर्वसामान्य जनता यात सहभागी झालेली आहे.
या पदयात्रेने दुपारपर्यंत अशोकवन इथपर्यंतचा प्रवास तिथेच भोजन घेऊन विश्राम केला. आज सायंकाळी यात्रा बुटीबोर येथे पोहोचणार असून तिथे जाहीर सभा व यात्रेचा मुक्काम असणार आहे.

