पुणे -मार्केट यार्ड आणि पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील मसाज पार्लर नंतर आता शहराच्या आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडी परिसरात पोलिसांनी एका बहुमजली इमारतीवर पोलिसांनी छापा टाकला.यावेळी मसाज पार्लर च्या नावाखाली येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकरणी एका महिलेसह चार आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये संदीप चव्हाण, रोहित शिंदे, स्वाती उर्फ श्वेता विजय शिंदे आणि गोपाळ यांचा समावेश आहे. पोलिस शिपाई वर्षा सावंत यांनी या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर-खराडी भागातील एका फिटनेस क्लब जवळ असलेल्या इमारतीत आरोपी मसाज पार्लर चालवत होते. या पार्लरमध्ये दलालांमार्फत छुप्या पद्धतीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाचा वापर केला.
खात्री पटल्यानंतर पोलिसांनी मसाज पार्लरवर अचानक छापा टाकून कारवाई केली. या छाप्यात पीडित तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, आरोपींनी या तरुणींना जास्त पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले आणि त्यातून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पुणे शहर परिसरात मसाज पार्लर च्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्तांनी अशा गैरप्रकारावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या चार दिवसांत पोलिसांनी तीन मसाज पार्लरवर छापे टाकून कारवाई केली आहे.

