पुणे (दि.२८) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ आणि विहित कालमर्यादेत शासनाच्या सेवा – सुविधा देण्यात येत आहे. पीएमआरडीएमधील एकूण २९ सेवांपैकी १९ सेवा ऑनलाइन देण्यात येत असून उर्वरित सेवा कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने सुरु आहे. आगामी काही दिवसात संबंधित सेवा पण ऑनलाइन करण्यात येणार असून त्यांची प्रकिया सुरु आहे.
शासनाने १५० दिवसाच्या उपक्रमांतर्गत नागरिकांना ऑनलाईन शासकीय सेवा – सुविधा देण्याचे निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने पीएमआरडीएच्या माध्यमातून शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यात येत आहे. पीएमआरडीएने सुरू केलेल्या या ऑनलाईन सेवांची माहिती अर्जदारांनी आपल्या ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर कळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीमधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी या २९ सेवा देण्यात येत आहेत.
पीएमआरडीएच्या संबंधित सेवांचा तपशील
विकास परवानगी विभाग : अभिन्यास / इमारत बांधकाम परवानगी, जोता मोजणी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, झोन दाखला, भाग नकाशा/नकाशा देणे, सुधारित बांधकाम परवानगी, तात्पुरते रेखांकन परवानगी, सुधारित तात्पुरते रेखांकन, अंतिम रेखांकन परवानगी, नूतनीकरण परवानगी, भागश: भोगवटा प्रमाणपत्र, साईट एलेवेशन प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येत आहे. यासह अभियंता परवाना, स्ट्रक्चरल इंजिनिअर परवाना, सुपरवायझर परवाना, नगर रचनाकार परवाना, आकाशचिन्ह परवाना, आकाशचिन्ह नियमितीकरण परवाना, विकासाचे उद्दिष्टे प्रमाणपत्र (IOD) या सेवा ऑफलाईन कार्यालयात उपलब्ध आहे.
जमीन व मालमत्ता विभाग : वाटप भूखंडाचे / गृहयोजनेतील सदनिकांचे हस्तातंरण करणे, वाटप भूखंडावर / गृहयोजनेतील सदनिकांवर वारसानोंद करणे, वाटप भूखंडावर / गृहयोजनेतील सदनिकांवर कर्जासाठी ना- हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन सुरु आहे. यासह प्राधिकरण मालकीच्या मोकळ्या जागा तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर देणे, भाडेपट्ट्यानंतर भूखंडाचा ताबा देणे आणि वाटप भूखंडाची फेरमोजणी करून देणे या सेवा ऑफलाईन आहे.
अग्निशमन विभाग : प्राथमिक अग्निशमन ना-हरकत दाखला अदा करणे, अंतिम अग्निशमन ना-हरकत दाखला अदा करणे, पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र, अग्निशमन बंदोबस्त या सेवा ऑनलाईन आहे. संबंधित सेवा आपले सरकार https://aaplesarkar.mahaonline.gov.in आणि पीएमआरडीएच्या https://www.pmrda.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

