पुणे :
ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांचे ‘स्पिती व्हॅली’(हिमाचल प्रदेश) छायाचित्र प्रदर्शन २८ सप्टेंबर रोजी बालगंधर्व कलादालनात उत्साहात सुरू झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर आणि रोटरीचे माजी प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्यास कला, साहित्य व संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.उद्घाटन प्रसंगी ‘संग्राहक श्री दिनकर (काका) केळकर छंदवेध पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावर्षी प्रा. सुहासचंद्र कुलकर्णी, श्रीनिवास जोगळेकर, मोहन शेट्ये, डॉ. आदित्य पोंक्षे आणि सौ. मोनिका कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. संग्रहाची आवड आणि छंद जोपासण्याच्या कार्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदाचे हे सातवे वर्ष आहे.

‘स्पिती व्हॅली’ या प्रदर्शनात हिमाचल प्रदेशातील स्पिती दरीचे निसर्गसौंदर्य टिपलेली १२० छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. उंच पर्वतरांगा, बर्फाच्छादित शिखरे, नद्या, तळी आणि स्थानिक संस्कृती यांचे अप्रतिम दर्शन या छायाचित्रांतून घडते. प्रदर्शनाला रसिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून दररोज सकाळी १० ते रात्री साडेआठपर्यंत ते विनामूल्य सर्वांसाठी खुले आहे. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले. सौ.अरुणा केळकर, कुलदीप जोशी,डॉ. आदित्य केळकर, डॉ.जाई केळकर,सुरेश परदेशी, बडदे, सानिया केळकर,नाना बारवकर उपस्थित होते.डॉ.सुधन्वा रानडे यांनी आभार मानले.
डॉ.गो. बं.देगलूरकर म्हणाले,’ छायाचित्रातून छायाचित्रकाराची दृष्टी दिसते.जीवनाचे पैलू समोर येतात. डॉ.श्रीकांत केळकर हे हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे. त्यांनी मोबाईल कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्रे थक्क करणारी आहेत. सौंदर्य टिपणे,प्रसंग टिपणे ही अनोखी कला आहे. त्यासाठी दृष्टी हवी,पण वृत्तीही महत्वाची आहे.मूर्ती मधील भाव न्याहाळणे,समजून घेणे आणि छायाचित्रातील भाव न्याहाळणे या सारख्याच गोष्टी आहेत. छंदवेध पुरस्कार देण्याचा उपक्रम पुण्यातच होऊ शकतो.उपक्रमातील गुणग्राहकता उल्लेखनीय आहे’. रवी धोत्रे यांनीही मनोगत व्यक्त करून प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.डॉ. केळकर यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले की, “स्पिती व्हॅली ही निसर्गाच्या कुशीत विसावलेली अद्वितीय दरी आहे. तिचे भव्य नैसर्गिक सौंदर्य, ताऱ्यांनी सजलेले आकाश आणि स्थानिक सांस्कृतिक वैभव प्रत्येकाला भुरळ घालते.कै. दिनकर (काका) केळकर हे पुण्याच्या संग्रह परंपरेचे महर्षी होते. त्यांचा ध्यास म्हणजेच पुण्याचे वैभव. पुणेकरांची संग्रहाची आवड वृद्धिंगत व्हावी यासाठी आम्ही हा पुरस्कार सुरू केला आहे,’ असेही डॉ. श्रीकांत केळकर यांनी स्पष्ट केले.‘स्पिती व्हॅली’ छायाचित्र प्रदर्शन ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

