पहिल्याच दिवशी 30 संस्थांना मार्गदर्शन, 2 हजार 325 सदनिकाधारकांना लाभ
पुणे, दि. 28: राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते “मानिव अभिहस्तांतरण प्रकरणे अभिनिर्णय पूर्व तपासणी” विशेष अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानात 103 गृहनिर्माण संस्थांनी सहभाग नोंदविला असून पहिल्याच दिवशी 30 संस्थांची (2 हजार 325 सदनिका, दुकाने) प्रकरणे तपासून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर संतोष हिंगाणे, सह जिल्हा निबंधक पुणे ग्रामीण प्रविण देशपांडे आदी उपस्थित होते.
श्री. बिनवडे म्हणाले, विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘एक जिल्हा एक नोंदणी’, ‘सलोखा योजना’, ‘ई-प्रमाण, फेसलेस रजिस्ट्रेशन’ या सुविधा यशस्विरित्या अंमलबजावणी केली आहे. सह जिल्हा निबंधक पुणे शहरच्यावतीने राबविण्यात येणारे “मानिव अभिहस्तांतरण प्रकरणे-अभिनिर्णय पुर्व तपासणी” हे विशेष अभियान नागरिकाभिमुख असून अशा प्रकारचे उपक्रम स्वयंप्रेरणेने राबविणे हे कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात अभियानात सहभागी संस्थांच्या वतीने शंकरकाया सोसायटी, म्हात्रे पुलाजवळ, कोथरूडच्या सभासदांनी राज्य शासन व विभागाचे आभार मानले.
शासनाच्या विविध विभागांतर्फे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा गतिमान व सकारात्मकतेने दिल्या जाव्यात आणि लोकाभिमुख कामकाजाचे सुत्र अधिकाधिक अंगिकारले जावे, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेवा उपक्रमाअंतर्गत सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर कार्यालयाने सहकारी गृहरचना संस्थांची मानीव अभिहस्तांतरणाची प्रकरणे सत्वर निकाली काढण्याच्या उद्देशाने “मानिव अभिहस्तांतरण प्रकरणे अभिनिर्णय पूर्व तपासणी” विशेष अभियानाचे 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले.
श्री. हिंगाणे यांनी या विशेष अभियानाचे स्वरुप, व्याप्ती आणि सर्व सामान्य नागरिकांना त्याचा कसा उपयोग होईल याबाबत माहिती दिली.
या अभियानामध्ये अधिकाधिक गृहनिर्माण संस्थांनी सहभाग नोंदवावा. कार्यालयाचा jdr.punecity@gmail.com ईमेलवर ईमेल करावा. वाढता प्रतिसाद विचारात घेता दिवाळीनंतर अशाप्रकारचे शिबीराचे आयोजन करण्यात येईल असेही, श्री. हिंगाणे यांनी सांगितले.

