पुणे-२७व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत आज आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १३ ते २० वर्षे, २१ ते ४० वर्षे आणि ४१ वर्षांपुढील असे महिलांचे गट होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेचा सुंदर आविष्कार घडवीत देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडविले.
शिवदर्शन-सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात झालेल्या महिलांच्या या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध वयोगटांतील २००हून अधिक महिलांनी भाग घेतला होता. स्पर्धेत अनेक महिला कालीमाता, मीनाक्षी देवी यांच्या प्रभावी वेशभूषेत सहभागी झाल्या. त्याचप्रमाणे काहींनी भारत माता, जिजाबाई, सावित्रीबाई फुले, जनाबाई, शेतकरी स्त्री यांच्या रूपात अवतरून आपल्या सशक्त आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची छाप सोडली. विशेष म्हणजे एका स्पर्धक महिलेने प्लॅस्टिकचे रूप धारण करून समाजात पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. त्याला प्रेक्षकांकडून दाद मिळाली.
संपूर्ण स्पर्धा रंगतदार वातावरणात पार पडली. सहभागी महिलांनी सादर केलेली वेशभूषा, आत्मविश्वास व आकर्षक प्रस्तुतीमुळे प्रेक्षक भारावून गेले. महिलांचा सहभाग व उत्साह यांमुळे नवरात्रौ महिला महोत्सवाचे सौंदर्य आणखीनच खुलून आले. प्रारंभी महिलांनी देवीची आरती केली.
या उपक्रमाबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी समाधान व्यक्त केले. महिलांच्या अशा सहभागामुळे समाजात संस्कृती जपण्यासोबतच प्रेरणादायी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे आणि सामाजिक संदेश अधोरेखित होत आहेत, असे मत व्यक्त करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
४१ वर्षांपुढील वयोगट
प्रथम क्रमांक – रोहिणी टिळक
द्वितीय क्रमांक – नंदा जोशी
तृतीय क्रमांक – स्वाती पवार
चतुर्थ क्रमांक – रत्नमाला खिवंसरा
२१ ते ४० वयोगट
प्रथम क्रमांक – राजश्री हबीब
तृतीय क्रमांक – योगिता पिंपळगावकर
चतुर्थ क्रमांक – मयूरी देवकर
१३ ते २० वयोगट
प्रथम क्रमांक – श्रुती विश्वकर्मा
द्वितीय क्रमांक – स्वरांगीता जाधव
तृतीय क्रमांक – प्रांजल अवचिते
चतुर्थ क्रमांक – सृष्टी धस
बक्षिसे ३००० रुपये, २००० रुपये, १००० रुपये आणि ५०० रुपये अशी होती.
सर्व स्पर्धकांना प्रसाद व भेटवस्तू देण्यात आल्या.

