पुणे :
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, पुणे आणि सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग (मिनिस्ट्री ऑफ कल्चर), दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा पर्व २०२५’ अंतर्गत आयोजित ‘विकसित भारत के रंग, कला के संग’ या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी एरंडवणे शैक्षणिक संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत शालेय गटात ७०० हून अधिक आणि महाविद्यालयीन गटात ३५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. एकूण १०८५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सभागृहात झाले. यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सीसीआरटीचे अध्यक्ष डॉ. विनोद इंदुरकर, उपसंचालक दिबकर दास, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे संचालक प्रा. शारंगधर साठे आदी मान्यवर उपस्थित होते.र्धा शालेय गटासाठी सकाळी ११ ते दुपारी १ आणि महाविद्यालयीन गटासाठी दुपारी ३ ते ५ या वेळेत पार पडली. रंग, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलतेने परिपूर्ण कलाकृतींमुळे वातावरण रंगतदार झाले. प्रत्येक विद्यार्थ्याला सीसीआरटी तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.संध्याकाळी ६ वाजता पारितोषिक वितरण व समारोप सोहळा संपन्न झाला. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे निवडक चित्रकृती दिल्ली येथील कला अकादमीमध्ये प्रदर्शित होणार आहेत.या उपक्रमामुळे पुण्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि कलाकारांना कला व संस्कृतीच्या उत्सवाचा अविस्मरणीय अनुभव घेता आला.
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना डॉ. मेधा कुलकर्णी यांनी प्रथमत: अशा प्रकारची चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि CCRT यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी व कला शिक्षकांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, उत्कृष्ट कला शिक्षकच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व व भवितव्य घडवू शकतात. आज शालेय शिक्षणात कला विषयांना मिळालेल्या महत्त्वामुळे ही जबाबदारी कला शिक्षक अतिशय उत्तम रित्या पार पाडत असल्याचे दिसून येते. डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाल्या, उद्याची पिढी ही या अनुभवांमुळे अतिशय समृद्ध असणार आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. इंदुरकरांनी जीवनातील कलेचे महत्व अधोरेखित केले आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. शालेय शिक्षणातील इतर व कला विषय हे वेगळे करताच येणार नाहीत. कलेच्या माध्यमातूनच इतर विषय अधिक उत्तमरीत्या समजू शकतात. संगीत, नृत्य, कीर्तन शिक्षण क्षेत्रातील दर्जा, कलेचे कार्य करण्याची धडाडी लक्षात घेता डॉ. इंदुरकर म्हणाले की, भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् सोबत केलेला कराराअंतर्गत आता वर्षभर विविध उपक्रम राबविले जातील आणि याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. शारंगधर साठे यांनी स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ची माहिती दिली. ते म्हणाले , ‘स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे कलेतील कार्य बघून CCRT, नवी दिल्ली ने आमच्याशी सामंजस्य करार केला आहे. आजचा कार्यक्रम या करारातील पहिला कार्यक्रम होता. यातून विदयार्थ्यांना संधी मिळणार आहे’.

