पुणे –
प्रसेनजीत फडणवीस यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (वायसीएमओयू, नाशिक) व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यार्थी दशेपासून फडणवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. २०१७-२०२२ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य म्हणून गेली आठ वर्षे ते कार्यरत आहेत. अधिसभेत विविध विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. ‘एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन’च्या संचालक मंडळाचे ते सदस्य आहेत.
फडणवीस म्हणाले, “यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असल्याने व्यापक स्वरूपात काम करण्याची संधी मिळणार आहे. सर्वांसाठी शिक्षण, मुक्त व दूरस्थ शिक्षण पद्धतीचा प्रसार, समाजातील सर्व घटकांसाठी अभ्यासक्रमांची उपलब्धता, स्वयंअध्ययन आणि लवचिकता, आजीवन शिक्षणाचा प्रचार कौशल्य विकास व व्यावसायिक शिक्षण ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे.”
आयआयटी बॉम्बे येथील संशोधक प्राध्यापक डॉ. अक्षय निकूंभ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर कॉलेजचे मनोहर गुजराथी यांचीही विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली आहे.

