पुणे-लग्नानंतर अवघ्या 45 दिवसांत संसारवेल तुटल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला तब्बल 45 लाख रुपयांची पोटगी दिल्याची घटना पुण्यात घडली आहे. या महागड्या घटस्फोटाची चर्चा आता कुटुंब न्यायालयात रंगली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, या प्रकरणातील दाम्पत्याचा जानेवारी 2022 मध्ये विवाह झाला होता. लग्न अतिशय थाटामाटात झाले होते. पण नवरी सासरी नांदण्यास गेल्यानंतर लग्नातील हुंडा व मानपान या मुद्यांवर कुटुंबात कुरबुरी निर्माण झाल्या. त्यानंतरही काही दिवस तसेच गेले. त्यानंतर पतीने पत्नीला ‘मला तू पसंत नाहीस, कुटुंबाच्या दबावाखाली मी हे लग्न केले’ असे टोमणे मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे पती-पत्नीतील मतभेद टोकाला गेले. त्यातच हा वाद चिघळल्यानंतर सासरच्या मंडळींनी एकेदिवशी नवरीला थेट घराबाहेर काढले.
या घटनेनंतर पीडित महिलेने पती, सासू, सासरा व नणंदेविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात कौटुंबिक छळ व हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सविस्तर तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मधल्या काळात पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या अर्जानंतर पत्नीची बाजू लढवणाऱ्या वकील प्रियांका काटकर व वकील रेश्मा सोनार यांनी दोन्ही पक्षांचे समुपदेशन करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यात पतीने 45 लाख रुपयांची एकरकमी पोटगी देण्यास सहमती दर्शवली. त्याला पत्नीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला.
त्यानंतर वर्षभरापासून एकमेकांविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या या दाम्पत्याच्या घटस्फोटावर कोर्टाने शिक्कामोर्तब केला. पत्नीच्या वकिलांनी केलेल्या समुपदेशनातून या कौटुंबिक वादात तडजोडीचा मार्ग निघाला आणि एकरकमी पोटगीच्या बदल्यात या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. या घटनाक्रमानंतर नववधूने सासरच्या मंडळीविरोधात दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा मागे घेतला.

