खड्ड्यांमुळे वाढलेला धोका
टेंभुर्णी (सोलापूर बायपास), दि. २६ सप्टेंबर २०२५ :
महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर आज टेंभुर्णी बायपासवर फुटले. मात्र, धाराशिव येथील शासकीय गाडीवरील चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला. डॉ. गोऱ्हे या सोलापूरहून पुण्याकडे निघाल्या असताना ही घटना घडली.टेंभुर्णीच्या बायपास मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्यामुळे प्रवासादरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली. डॉ. गोऱ्हे यांच्या गाडीनंतर प्रवास करणाऱ्या आणखी दोन वाहनांचेही टायर त्याच परिसरात फुटले. यामुळे या रस्त्यावरील गंभीर स्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
घटनेनंतर डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले. नागरिकांचे आणि प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ नयेत म्हणून त्वरित कारवाई करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगात डॉ. नीलम गोऱ्हे पूर्णपणे सुखरूप असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृतपणे कळविण्यात आले आहे.

