मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील पूरस्थितीमुळे येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याची घोषणा केली आहे. आयोगाच्या निर्णयानुसार, आता ही परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी घेतली जाईल. आयोगाने आज जारी केलेल्या एका शुद्धिपत्रकाद्वारे हा निर्णय कळवला आहे.
राज्यात सध्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे हाहाकार माजला आहे. अनेक गावांना पुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच लहान मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. राज्यातील पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात यावी, असे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार आयोगाने आज 28 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा लांबणीवर टाकण्याची घोषणा केली आहे. आयोगाच्या निर्णयानुसार आता ही परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी होईल.

काय म्हटले आहे आयोगाने आपल्या शुद्धिपत्रकात?
आयोगाने आपल्या शुद्धिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवरील 524 उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. तथापि, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांतील विविध गावांचा तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा -2025 दिनांक 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येईल.
उपरोक्त परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट -ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2025 चा सुधारित दिनांत शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
या शुद्धिपत्रकावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपसचिव, जाहिरात यांची स्वाक्षरी आहे.
आयोगाने विद्यार्थ्यांना केलेल्या सूचना
तत्पूर्वी, आयोगाने एका परिपत्रकाद्वारे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी काही ठळक सूचना दिल्या होत्या. त्या सूचना खालीलप्रमाणे होत्या.
परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन मुद्रित केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील Guidelines for Examination या सदराखाली उपलब्ध असलेल्या “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे” काळजीपूर्वक अवलोकन करावे.
परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.
ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे.
परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास परवानगी नाही.
परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेश अनुज्ञेय नाही.
परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पडताळणी/तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी/तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल.
परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.
कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधी अथवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची (Debar) तसेच प्रचलित नियम/कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

