तुळजापूर, दि. २६ सप्टेंबर २०२५ :
नवरात्र उत्सवानिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांचे दुःख हलके व्हावे, त्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत आणि योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील लेकरं सुरक्षित राहावीत, त्यांना योग्य शिक्षण मिळावे, शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच माझी प्रार्थना आहे. शेतकरी आत्महत्येच्या मार्गाला जात आहेत, त्यांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी शक्ती आणि धैर्य लाभावे, अशी विनंती मी आईकडे केली.”
तसेच त्यांनी महायुती सरकारच्या संवेदनशील कामकाजाचे कौतुक केले. “पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही दिलासादायक बाब आहे,” असे त्या म्हणाल्या.
या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हा प्रमुख भारती गायकवाड, अर्चना दराडे, जिल्हा संघटक किरण ताई निंबाळकर, तालुका प्रमुख माया चव्हाण, तालुका प्रमुख (कळंब) आशा अव्हाड, शहर प्रमुख महादेवी माळी आदी मान्यवरांचा समावेश होता.

