मुंबई : तृतीयपंथी समाजासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी राज्य सरकारने ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या आदेशानुसार ही तरतूद २०२५-२६ या आर्थिक वर्षात करण्यात आली आहे.
तृतीयपंथी समाज हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असल्याने त्यांचा सामाजिक प्रवाहामध्ये सहभाग वाढवण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाचे सशक्तीकरण व मुख्य प्रवाहात समावेश साधण्याचा प्रयत्न आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मंजूर निधीचा वापर राज्यस्तरीय नाट्य, नृत्य, संगीत महोत्सव, कला संमेलन, तसेच इतर सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी करण्यात येणार आहे. या खर्चासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात आली आहे.
कार्यक्रमांचे आयोजन पारदर्शकतेने व्हावे यासाठी संबंधित संचालकांना दर महिन्याला खर्चाचा हिशोब शासनास अहवालासह सादर करावा लागणार आहे.

