श्री गणेशाची पितांबर नेसवून सालंकृत पोशाख पूजा ; नवरात्रात विनायकी चतुर्थीला टिपऱ्या खेळण्याची परंपरा
पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात अश्विन शु. चतुर्थी म्हणजेच नवरात्री मधील विनायकी चतुर्थी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची परंपरा आहे. यानिमित्ताने श्री गणेशाची पितांबर नेसवून सालंकृत पोषाख पूजा करून मोरयासमोर ठकार पुजारी, विश्वस्त आणि परिसरातील गणेशभक्तांनी गुलाल उडवत टिपऱ्यांचा खेळ खेळला.

यावेळी ग्रामदैवत श्री कसबा गणपती देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार, यांसह विश्वस्त मंडळ उपस्थित होते. नवरात्रीतील विनायकी चतुर्थी सकाळी शक्ती सांस्कृतिक समूहातर्फे महिलांनी अथर्वशीर्ष पठण व श्रीसुक्त पठण केले. अनिता बिरजे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मंदिराच्या माजी प्रमुख विश्वस्त संगीता ठकार उपस्थित होत्या. त्यानंतर दुपारी श्री गणेशाची पितांबर नेसवून सालंकृत पोषाख पूजा करण्यात आली होती.
रात्री प्रथेनुसार मंदिरात श्रीमन्महासाधू मोरया गोसावी यांनी रचलेल्या आरत्या म्हटल्या गेल्या. चिंचवड देवस्थान संचालित देवस्थानांव्यतिरित फक्त ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात या आरत्या रोज मोठ्या श्रद्धेने म्हटल्या जातात. नवरात्रीसारख्या काही विशेष दिवसांसाठी टिपूरी घालती तुझे महाद्वारी हो, आनंदले भक्त नाचती गर्जती हो…. हे श्रीमन्महासाधू श्री मोरया गोसावी यांनी रचलेले टिपऱ्या पद म्हटले जाते.
रात्री आरतीच्या वेळी ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात मोरयासमोर ठकार पुजारी, विश्वस्त आणि परिसरातील गणेशभक्तांनी गुलाल उडवत टिपऱ्यांचा खेळ खेळला. नवरात्रात विनायकी चतुर्थी ला टिपऱ्या खेळण्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून आजतागायत चालूच आहे. या पदावेळी पुजारी प्रमोद ठकार यांनी कसबा गणपती समोर पारंपरिक नृत्यसेवा अर्पण केली. तर, दृष्टीच्या पदावेळी पुजारी सीमा ठकार यांनी गणपतीची दृष्ट देखील काढली.
आरती समाप्तीला वर्धन ठकार यांनी पंचारती ओवाळून शेजारती संपन्न केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन मंदिराचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनात झाले. याप्रसंगी ओंकार ठकार, अनय ठकार, अमेय ठकार, विक्रम ठकार, वरद ठकार, सुधा ठकार, अश्विनी ठकार आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

