पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन च्या वतीने सनातन वेद रक्षक आणि हिंदू स्वाभिमान रक्षक पुरस्कार प्रदान
पुणे : आपण आपसात भांडत बसलो तर त्याचा फायदा बाहेरचेच घेतील. म्हणून बंधुत्वाची भावना टिकवणे गरजेचे आहे. सण, उत्सव, जयंती आणि पुण्यतिथी आपण ज्या पद्धतीने साजरे करतो त्यावरून आपली संस्कृती टिकेल की नाही हे ठरते. आज नवरात्र उत्सवात द्विअर्थी गाणी लावली जातात, हे संतापजनक आहे. पुढील पिढी योग्य पद्धतीने धर्माची उपासना करणारी आणि संस्कारित व्हावी, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन च्या वतीने सनातन वेद रक्षक व हिंदू स्वाभिमान रक्षक पुरस्कार वितरण सोहळा आणि धर्मचैतन्य मासिक प्रकाशन समारंभाचे आयोजन केसरी वाड्यातील लोकमान्य सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सनातन वेद रक्षक पुरस्कार काळाराम मंदिर नाशिकचे गुरुवर्य महंत सुधीरदास महाराज यांना तर हिंदू स्वाभिमान रक्षक पुरस्कार आमदार महेश लांडगे यांना प्रदान करण्यात आला. कार्तिक लांडगे यांनी महेश लांडगे यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
यावेळी अवधूत शास्त्री उंडे, अशोक कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी, शिवाजी जांभळे, दत्तात्रय कामठे, कुंदन निकम, विश्वजीत देशपांडे, कुणाल टिळक, शाम कुलकर्णी, मयुरेश अरगडे, मंदार रेडे, मनोज तारे, चैतन्य जोशी, दिवेकर गुरुजी, हेमंत कापरे उपस्थित होते. तसेच कार्यक्रम प्रसंगी महेश जोशी, राहुल भाले, अनिल पुराणिक, नंदकुमार अलाटे, चैतन्य कुलकर्णी, दिपाली कुलकर्णी, अश्विनी जोशी, नंदिनी पुरंदरे, मृण्मयी कुलकर्णी, तृप्ती लाळे, माधवी लाळे, सचिन कुलकर्णी हे देखील उपस्थित होते.
प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या, सनातन धर्मात मूळतः जातीव्यवस्था नव्हती. इंग्रजांच्या कारकिर्दीत त्याची विकृती झाली. जन्माने नव्हे तर विद्या आणि संस्कारांनीच कोणीही ब्राह्मण ठरतो. म्हणूनच आपल्याला बुद्धी सापेक्ष विचार करून धर्माशी प्रामाणिक राहायला हवं. आपला हिंदू धर्म नित्य नूतन सर्वांना सामावून घेणारा आहे. जगातील सगळ्यात प्राचीन धर्म हिंदू धर्मच आहे.
धर्म आहे तिथेच चैतन्य असते. बाकी कुठल्याही गोष्टीत इतके चैतन्य दिसत नाही. वक्फ बोर्डाच्या निमित्ताने किती भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे हे लक्षात आले आणि प्रश्न पडतो हिंदू इतके दिवस झोपले होते का? असा प्रश्न पडला.
महंत सुधीरदास महाराज म्हणाले, प्रत्येक शाखेला उपनिषद, ब्राह्मण, संहिता, श्रौतसूत्र, सामान्य सूत्र हे नेमून दिलेले आहेत. त्या त्या शाखेच्या ब्राह्मणांनी गुरु शिष्य परंपरेतून ते शिकवले पाहिजेत म्हणजे ते सुरक्षित होतात.
पौरोहित्य पुरोहित फाऊंडेशन चे अध्यक्ष आणि धर्मचैतन्य मासिकाचे संपादक शामराव कुलकर्णी म्हणाले, मंदिरातील पुरोहितांना मानधन देण्यात यावे त्यामुळे पुरोहितांना बळ मिळेल. शहरातील पुरोहितांची परिस्थिती ठीक असली तरी गावांमधील पुरोहितांची परिस्थिती अत्यंत अवघड आहे, त्यांना तिथे काम मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांना मानधन देणे किंवा पेन्शन सुरू करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

