पुणे – शिवदर्शन–सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिर नवरात्रौनिमित्त सजले असून, लक्षावधी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारा ‘मीनाक्षीपुरम मंदिर’ देखावा विशेष आकर्षण बनला आहे. हजारो भक्तांची येथे गर्दी उसळत असून, श्री लक्ष्मीमाता मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. संपूर्ण मंदिराला नव्या रंगाने झळाळी आली आहे. मंदिराभोवती आकर्षक भव्य कमानी उभारण्यात आल्या असून, प्रशस्त मंडपही उभारण्यात आला आहे. मंदिरावर एलईडी लाइट्ससह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली असून, साकारण्यात आलेला ‘मीनाक्षीपुरम मंदिर’ देखावा १००हून अधिक कारागिरांनी सुमारे १ महिना कष्टपूर्वक तयार केला आहे. विविध नैसर्गिक सुवासिक लाखो फुलांची आरास मंदिरावर दररोज केली जाते आहे . मंदिराचे प्रांगण आकर्षक रांगोळीने रोज सजविले जाते आहे .

मंदिरातील श्री लक्ष्मीमातेची संगमरवरी मूर्ती अधिक तेजोमय दिसत आहे. येथे पूजा व आरती रोज होत असून, धूप व उदबत्त्यांच्या मधुर वासामुळे साऱ्या मंदिर परिसरात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. घटस्थापनेच्या दिवशी येथे घटस्थापना पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाली. तसेच मीनाक्षीपुरम मंदिराच्या प्रतिकृतीचेही उद्घाटन करण्यात आले. श्री लक्ष्मीमातेला सोन्याचा मुकुट, विविध सोन्याचे दागिने व सोन्याची आभूषणे यांसह चांदीची साडी यांनी सजविण्यात आले आहे.
येथे रोज सकाळी व संध्याकाळी श्री लक्ष्मीमातेची आरती, तसेच प्रसादवाटप होत असून, नवरात्रौच्या कालावधीत रोज अनेक महिला मंडळांची भजने संपन्न होत आहेत. अष्टमीला होमही करण्यात येणार आहे. हे मंदिर भाविकांसाठी रोज सकाळी ६.०० ते रात्री १०.००पर्यंत खुले असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे कॅमेरे बसविण्यात आले असून, पोलीस बंदोबस्तही चोख आहे. याच मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे कार्यक्रम व स्पर्धा होत आहेत, अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.

