पुणे-गेल्या दोन दिवसांपूर्वी कल्याण येथे दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्ट व्हायलर केली म्हणून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते (ज्येष्ठ नागरिक) प्रकाश उर्फ मामा पगारे यांच्यावर भारतीय जनता पक्षाशी संबधित असलेल्या ८ ते १० गुंड प्रवृतीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला व त्यांना भर रस्त्यात साडी नेसवून त्यांचा अपमान केला. पगारे हे मागासवर्गीय समाजाचे आहेत, त्यांना एकटे गाठून या भाजपाच्या गुंडानी त्यांच्यावर हल्ला केला ही गंभीर स्वरूपाची घटना असून पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही ही अत्यंत दुर्दैवी व लाजिरवाणी बाब आहे. या घटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
कल्याण सारखी घटना पुणे शहरामध्ये घडू नये व या गुंडावर तातडीने कडक कारवाई व्हावी यासाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहराचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले.निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर त्वरीत कारवाई न झाल्यास पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, अनुसूचीत जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, प्राची दुधाणे, राज अंबिके, फिरोज शेख, मुन्ना खंडेलवाल, कुणाल चव्हाण आदी उपस्थित होते.

