पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदणीचे आवाहन
पुणे, दि. २५: १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा (De-Novo) कार्यक्रम जाहीर झाला असून सन २०२० मध्ये नाव नोंदणी असलेल्या पदवीधर व शिक्षकांना पुन्हा नव्याने नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे यादृष्टीने राजकीय पक्षांनी व शिक्षण संस्थांनी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
विधान भवनात आयोजित पदवीधर व शिक्षक मतदार संघातील याद्यांमध्ये नव्याने नाव नोंदणी करण्यासंदर्भात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीत डॉ. पुलकुंडवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, राजकीय पक्षांचे जिल्ह्यातील प्रमुख, प्रतिनिधी तसेच विभागातील सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी, राजकीय पक्ष प्रमुख व शैक्षणिक संस्था प्रमुख दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, पदवीधर नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १८ व शिक्षक नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १९ भरुन देणे आवश्यक आहे. भारतातील कोणत्याही विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान ३ वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणारा पदवीधर पात्र राहील. तसेच २०१९ ते २०२५ या कालावधीत किमान ३ वर्षे शिक्षक पदावर कार्यरत असलेला, माध्यमिक व त्यावरील दर्जाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक नाव नोंदणीसाठी पात्र राहील. शैक्षणिक संस्था एकत्रितरित्या सर्व शिक्षकांचे नोंदणी अर्ज संबंधित तहसील कार्यालयात जमा करु शकतात. शैक्षणिक संस्थांनी नमुना क्रमांक २ मधील शिफारशीसह अर्ज सादर करावेत, चुकीची माहिती सादर करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
कोणत्याही राजकीय पक्षामार्फत, पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, नागरीक कल्याण संघटना आदींकडून एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील पदवीधर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी. कोणीही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असेही ते म्हणाले.
नाव नोंदणी वाढविण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने व्हावी, सुट्टीच्या दिवशी गृहनिर्माण संस्थांमध्ये नाव नोंदणीसाठी शिबीरे आयोजित करावीत, आदी सूचना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केल्या.
मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम
जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार ३० सप्टेंबर २०२५, वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी- बुधवार १५ ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी- शनिवार २५ ऑक्टोबर, नमुना क्रमांक १८ किंवा १९ द्वारे दावे स्वीकारण्याचा अंतिम दिनांक-गुरूवार ६ नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- गुरुवार २० नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- मंगळवार २५ नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- गुरुवार २५ डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- मंगळवार ३० डिसेंबर २०२५.

