चौथ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात वीणा गोखले यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’पानशेतमध्ये २७ व २८ सप्टेंबरला होणाऱ्या महोत्सवाला छाया कदम, विठ्ठल काळे यांची उपस्थिती
पुणे: जागतिक पर्यटन दिवसानिमित्त परभन्ना फाउंडेशन, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ आणि धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या निमित्ताने पर्यटन क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ यंदा गिरीसागर टूर्सच्या संचालिका वीणा गोखले यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संयोजक गणेश चप्पलवार यांनी दिली.
गणेश चप्पलवार म्हणाले, “येत्या शनिवारी (दि. २७ सप्टेंबर २०२५) व रविवारी (दि. २८ सप्टेंबर २०२४) वरसगाव (पानशेत) येथील सूर्य शिबिर रिसॉर्ट येथे हा लघुपट महोत्सव होत आहे. यंदा महोत्सवात १७ राज्य आणि दोन देशांतून ६१ लघुपट, माहितीपटांपैकी १७ माहितीपट व लघुपटाचे स्क्रीनिंग होणार आहे. महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भोरचे आमदार शंकर मांडेकर, राज्य पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्त लेखाधिकारी चित्रलेखा खातू, ‘एमटीडीसी’चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक सुशील पवार, उपसंचालिका शमा पवार, ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष पंकज देवरे आदी उपस्थित राहणार आहेत.
“महोत्सवाचा समारोप अभिनेत्री छाया कदम, अभिनेता विठ्ठल काळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उत्तम कलाकृतींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत. तसेच वीणा गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार, तर अमित कुलकर्णी (गेट सेट गो हॉलिडेज) यांना ‘बेस्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स अवॉर्ड’ दिला जाणार आहे. यासह सर्वोत्कृष्ट लघुपट व सर्वोत्कृष्ट असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. महोत्सवात ‘पानशेतमधील महोत्सवाचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिणाम’ आणि ‘पानशेतमधील निसर्ग, इतिहास आणि पर्यटनातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर परिसंवाद होणार आहेत,” असे गणेश चप्पलवार यांनी कळवले आहे.

