-माजी आमदार मोहन जोशी
पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) चे स्वतंत्र केंद्र होण्याऐवजी उपकेंद्र पुण्यात होणार, ही घोषणा निराशाजनक असून भाजपचे सरकार पुण्याला नेहमी दुय्यम वागणूक का देत आहे? असा सवाल माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना केला आहे.
वास्तविक पाहता पुण्याला स्वतंत्रपणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ची गरज आहे. पुण्यातील उद्योजक, आयटी तज्ज्ञ आणि अभ्यासकही ही मागणी गेली अनेक वर्षे मांडत आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र, आयआयएम चे स्वतंत्र केंद्र पुण्यात न झाल्याने आयटी क्षेत्रातही नाराजीच्याच प्रतिक्रिया आहेत. पुण्यात जागा, शैक्षणिक वातावरण, शिक्षण तज्ज्ञ असं सगळं उपलब्ध असताना यापूर्वीच पुण्यात हे केंद्र उभं रहायला हवं होतं. पण, आधी नागपूर, नंतर मुंबई या भागांमध्ये हे केंद्र उभं रहातं, पुण्यात मात्र उपकेंद्र उभं रहातं, अशी खंत मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आयआयएमचे उपकेंद्र पुण्यात आणण्याचा प्रस्ताव मंजूर झाला, त्याचा गाजावाजा झाला. प्रत्यक्षात ती गोष्ट निराशाजनकच आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी पत्रकात केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मेट्रोचा प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, रिंग रोड प्रकल्प राबविताना पुण्याला दुय्यम वागणूक दिलेली आहे. पीएमपी बससेवेत अधिकारी नेमतानाही अस्थिरता ठेवलेली आहे. मोठ्या प्रकल्पांच्या केवळ घोषणा करणे, पंतप्रधान मोदी यांनी येऊन मेट्रो चे तीन, चार वेळा उदघाटन करणे असे देखाव्याचे कार्यक्रम चालले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी गाजावाजा केलेल्या स्मार्ट सिटी योजनेतून पुण्याचा काहीही विकास झालेला नाही, उलट स्मार्ट सिटी योजना मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे फसलीच आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकात केला आहे.

