“स्मार्ट सिटी”चा ध्यास घेतलेल्या पुणे शहराने आता *‘ग्रीन सिटी’*कडे झेप घेतली आहे. पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करून,पुणेकरांनी सुर्याबरोबर मैत्रीपूर्ण करार करून छतावरच्या सूर्यकिरणांना कैद केलं..त्यातून स्वच्छ, मोफत आणि शाश्वत वीज निर्माण सुरु केलं. आता प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. हजारो घरांच्या छपरांवर उभ्या राहिलेल्या सौरपॅनेल्समुळे केवळ वीजबिलं शून्यावर येत नाहीत, तर पर्यावरण संवर्धनाचाही नवा अध्याय लिहिला जातो आहे.
उन्हाचे सोने – विजेचे धन
“उन्हामुळे छत तापायचं आणि बिलं वाढायची, पण आता त्याच छतावर सूर्या बरोबर मैत्रीपूर्ण करार करून त्याच्या तापण्याला कैद करून मोफत वीज तयार होतेय!” — हा अनुभव आहे पुणेकरांचा.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे पुण्यातील तब्बल १८६९४ घरांनी आपल्या छतावर सौर पॅनेल्स उभारले आहेत. त्यातून तब्बल ९०.६२ मेगावॅट वीज निर्मिती होत असून १५१ कोटी रुपयांचे अनुदान पुणेकरांना मिळाले आहे.
विजेपासून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
या योजनेमुळे अनेक घरांचे मासिक बिल शून्यावर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनेतून देशभरात ५८८९ मेगावॅट क्षमता तर महाराष्ट्रात ११०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले गेले आहेत. पुण्यातही हा बदल झपाट्याने दिसतो आहे.
पुणे परिमंडलातील प्रगती
३१,६४९ नोंदणी, त्यापैकी १८,६९४ प्रकल्प कार्यान्वित,७३९७ प्रकल्प अंतिम टप्प्यात
मंडलनिहाय क्षमता –
गणेशखिंड : ७३१२ प्रकल्प, ३८.२१ मेगावॅट
पुणे ग्रामीण : ५१४६ प्रकल्प, २१.०७ मेगावॅट
रास्तापेठ : ६२३६ प्रकल्प, ३१.३४ मेगावॅट
अनुदान वितरण –
गणेशखिंड : ६२.४ कोटी,पुणे ग्रामीण : ३६.४ कोटी,रास्तापेठ : ५२.५८ कोटी.
पर्यावरणीय महत्व – स्वच्छ हवा, हरित पुणे
९०.६२ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प दरवर्षी जवळपास १.३ कोटी युनिट वीज तयार करतील. यामुळे दरवर्षी सुमारे ७०-७५ हजार टन कार्बन उत्सर्जन टळेल, जे ३.५ लाख झाडं लावल्यासारखं आहे.
म्हणजेच दरवर्षी पुणेकरांच्या श्वासातली हवा अधिक स्वच्छ होणार आहे.
वाढता एअर कंडिशनिंग वापर आणि औद्योगिक वसाहतींचा ताण कमी करण्यासाठी ही सौर ऊर्जा पुणेकरांना दिलासा देते आहे.
“सूर्य आला घराघरात”
समजा एक कुटुंब दर महिन्याला २५० युनिट वीज वापरत होतं. ३ किलोवॅटचा प्रकल्प बसवल्यानंतर त्यांचे बिल आता शून्यावर येऊ शकतं. उलट, जादा तयार झालेली वीज ग्रिडला विकून त्यांना उत्पन्नही मिळवता येऊ शकतं.वीजबिलाचा ताण जातो आणि मुलांनाही हरित वीज कशी पर्यावरणाला पूरक आहे याचा धडा मिळतो.
याचबरोबर एका गृहसंस्थेने ५० किलोवॅट प्रकल्प बसवून संपूर्ण सोसायटीच्या कॉमन एरिया लाइटिंगची बिलं शून्य करता येऊ शकतात . यामुळे नागरिकांमध्ये सौर ऊर्जेबद्दल प्रचंड आत्मविश्वास वाढला आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
पहिल्या २ किलोवॅटपर्यंत प्रतिकिलोवॅट ₹३०,००० अनुदान, ३ किलोवॅटसाठी ₹७८,००० अनुदान,गृहसंस्थांसाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रतिकिलोवॅट ₹१८,००० अनुदान, ‘जनसमर्थ पोर्टल’वरून ९०% कर्जाची सोय – गृहकर्जापेक्षाही कमी व्याजदरात महावितरणकडून ऑनलाईन प्रक्रिया, अनुदान वेळेत, वीजमीटर मोफत.
पुणेकरांना आवाहन
“पुणेकर सूर्यघर योजनेचे महत्व जाणतात. अधिकाधिक नागरिकांनी यात सामील व्हावे. वीजबिल वाचवून, पर्यावरण वाचवून आपण भविष्यातील पिढ्यांसाठी देणगी ठेवूया.”
असे आवाहन महावितरण पुणे परिमंडळा चे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे.
हरित क्रांतीची सुरुवात
पुणेकरांनी सूर्याला खरंच आपल्या घराशी जवळ आणलं आहे. आर्थिक बचत, पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जा स्वावलंबन या तिन्ही पातळ्यांवर त्यांनी अनुकरणीय आदर्श घालून दिला आहे. हा प्रवास फक्त विजेचा नाही, तर हरित पुण्याकडे नेणाऱ्या नव्या क्रांतीचा आहे. चला हरित पुणे करूया आणि पुण्याची वाटचाल स्मार्ट पुण्याकडे करूया…!!
- युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, पुणे

