पुणे -राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गांधी भवन, कोथरूड येथे आठ दिवसांचा ‘गांधी सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. या सप्ताहात विचारप्रवर्तक नामवंतांची व्याख्याने, प्रभातफेरी – शांतता मार्च, ‘गांधी’ चित्रपटासह अन्य प्रेरणादायी चित्रपटांचे रसग्रहण इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिली.
या ‘गांधी सप्ताह’चे उद्घाटन गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला, बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सायं. ५.३० वाजता सर्वधर्म प्रार्थनेने होईल. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती न्या. अभय ओक यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन होणार असून, सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी न्या. अभय ओक यांचे ‘नागरिकांची संविधानिक कर्तव्ये’ या विषयावर व्याख्यान होईल.
गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता शुभांगी मुळे व सहकारी यांचा प्रार्थना व भजनांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, असा दृढ संकल्प घेऊन सकाळी ९.३० वाजता कर्वे रस्ता – प्रभात रस्ता कॉर्नर पासून गांधी भवनापर्यंत ‘शांतता मार्च’ काढण्यात येणार आहे. समाजातील सर्व शांतताप्रेमी लोक, विशेषतः युवकांनी या शांतता मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.
सप्ताहात दररोज सायंकाळी ६ वाजता नामवंत व्याख्याते महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन करणार आहेत. यात अधिक कदम यांचे ‘काश्मीर आणि मी’, नीरज हातेकर यांचे ‘अस्वस्थ वर्तमानाचे अर्थशास्त्र’ व अभिजित देशपांडे यांचे ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही’ या व्याख्यानांचा समावेश आहे.
प्रत्येक राष्ट्र घडवण्यामध्ये महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन अशा अनेक जागतिक नेत्यांचा सहभाग आहे. अशा महान व्यक्तींच्या कार्याचा परिचय ऐतिहासिक पुस्तकांप्रमाणे चित्रपटांच्या माध्यमातूनही करून दिला गेला आहे. या चित्रपटांची ओळख करून देताना एकूणच चित्रपट कसे बघावेत, याबद्दल दृकश्राव्य (audio visual) कार्यक्रम रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता गांधी भवन येथे ज्येष्ठ समीक्षक सुहास किर्लोस्कर सादर करणार आहेत.
मंगळवार, ७ ऑक्टोबर सायं. ६.०० वाजता डॉ. जब्बार पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखत व संवादाचे आयोजन केले आहे. यात मुलाखतकार विनोद शिरसाट, डॉ. मोहन आगाशे व डॉ. कुमार सप्तर्षी सहभागी असतील.
‘गांधी सप्ताह’चा समारोप बुधवार, ८ ऑक्टोबर सायं. ६.०० वाजता गांधी भवन येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. यावेळी ‘महात्मा गांधी आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. याचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी असतील.
या आठ दिवसांच्या कार्यक्रमात खादी, पुस्तके, हस्तकला व गृहोपयोगी वस्तूंची प्रदर्शने गांधी भवन आवारात सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

