पुणे-चांगले रस्ते उखडून पैकेज नावाखाली पुन्हा पुन्हा ते करण्याचे घाट घातले गेले तरीही पुणेकरांच्या कराच्या पैशातून तब्बल ३०० कोटी खर्चून २०२३ मध्ये बनवलेले रस्ते दोन वर्षांतच उखडले आहेत खुद्द मुख्यमंत्र्यांना खड्डे दुरुस्त करा हो.. अशी आळवणी महापालिका आयुक्तांकडे करावी लागली.अन आता त्यांनंतर जरी महापालिकेच्या पथ विभागाला जाग आली असली तरी उशिरा जाग आली आहे असेच म्हणावे लागते कारण कुठले तरी रोज रोज इव्हेंट राबवित त्यावर चालणाऱ्या एखाद्या कंपनीच्या गळ्यात गळा घालून त्यांनी आणि वाहतूक नियोजन विभागाने सायकल ट्रॅक उभारून रस्ते भले मोठे रुंद करण्या ऐवजी अरुंद करून ठेवले १० वर्षे हून अधिक काळ झाला यावर लोक ओरडतात,ओरडून थकल्यावर दुचाकीस्वारांनी ते आता पदाक्रांत हि करून टाकले आणि आताशी कुठे झोपी गेलेले महापालिकेचे पथ विभाग जागे झाले आहे जे अर्थात पोलिसांच्या वाहतूक शाखेने जागे केले आहे.आणि हे सायकल ट्रॅक काढून घेण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे.पण हा घेताना नेहमीप्रमाणे अवदसा आठवणार नसेल तर हा पथ विभाग कसला ? या निर्णया बरोबर यांनी म्हणतात,पदपथ..जे पुणेकरांच्या हक्काचे कायम मानले गेले ते छोटे करण्याचा निर्णय घेतला आहे.हि अवदसा पथ विभागालाच आठवू शकते यात नवल नाही.
आधीच पदपथ यांनी ठेवलेत कुठे याचा भिंग लावून शोध घ्यावा लागेल जिथे आहेत तिथेही हे सुव्यवस्थित नाहीतच,आणि अगदीच अरुंद असे पदपथ आहेत तेही आता हे मोडायला निघालेत हि अवदसा नाही तर काय आहे ?
ज्या शहरांचे पदपथ ,रस्ते मोठ्ठाले त्या शहराचे सौंदर्य देखील वाखाणण्याजोगे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून आलेले आहे. BRT चा घाट घालून शेकडो कोटींची उधळपट्टी केलेली BRT आता नाहीसी झाली ‘सायकल चालवा..ची आरोळी देत सायकली आणल्या ,सायकल ट्रॅक करून शेकडो कोटी उधळले.आणि आता पदपथांची बारी आली आहे..
शहराच्या वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी METRO आणली…तरीही यांची हि नाटके सुरूच आहेत.कारण मेट्रो आणूनही पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार नव्हती हे देखील अधोरेखित होतेच…पण मिरवून घेतले,कौतुक करवून घेतले आणि पुन्हा पाढे पंचावन्न..
खरा प्रश्न आता असा पडणार कि,यांना खरोखर वाहतूक कोंडी सोडवायची आहे कि कायम ठेवून असाच उधळपट्टी कारभार चालवायचा आहे ? वाहने अजून मोठ्या संख्येने रस्त्यावर येतील,येत राहतील कारण महापालिकेच्या हद्दीला आपण लगाम घालणार नाही त्यामुळे शहराचा अजगर फुगत राहील, गलेलठ्ठ होत राहील पण शहाराच्या अंतर्गत आणि शहराबाहेरील रस्त्यांच्या रुंदीच्या नियोजनाचे काय ? ती अशीच छोटी ठेवायची… म्हणजे वाहतूक कोंडी होतच राहील आणि शेकडो कोटीच्या योजना आणायची संधी मिळतच राहील.. असे तर नाही ना ? रस्ते मोठे करणे त्यांचे नियोजन करून अंमलात आणणे हि कामे वस्ती होण्यापूर्वीच म्हणजे वसण्यापूर्वीच व्हायला हवीत,अनधिकृत बांधकामे बडी बडी इमारते अगोदरच पाडायला हवीत पण कारवाई होते ती पथारीवाले,स्टोल धारक आणि टपरी वाल्यांवर.. राजीव अगरवाल,अरुण भाटिया यांच्या काळात झाली तशी अनधिकृत बांधकामे निर्मूलनाची कारवाई नंतर कधी का नाही झाली आणि आता तशी कारवाई यांच्याकडून होणार आहे काय ? कुठल्या किती रुंदीच्या रस्त्यांवर किती मजली इमारतीला परवानगी असावी ? हॉटेल्स आणि कंपन्यांची पार्किंग व्यवस्था रस्त्यावर येते काय? याची शहानिशा न करता त्यांना परवाने द्यावेत काय? याचा कुठलाही विचार महापालिकेने कधी केला आहे का नाही ? असाही प्रश्न विचारावा लागणार आहे.मग अशा स्थितीत आपण वाहतूक कोंडी मुक्तीची स्वप्ने पहावीत काय हाही प्रश्न आहेच.
शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि २२ चौकांत वाहतूक कोंडी होत असल्याबद्दल महापालिका प्रशासनाने आता कुठे माहिती संकलित केली आहे. त्यावर वाहतूक पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत एका महिन्यात त्वरित होणारी कामे पूर्ण करून रस्ते मोठे व अडथळा मुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच पादचारी मार्ग लहान करणे, जागा ताब्यात घेणे अशा प्रकारच्या कामांना वेळ लागणार असल्याचे सांगितले आहे .पुण्यातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी का होत आहे? याचे कारणे आत्ता शोधून त्याचा अहवाल पथ विभाग, बांधकाम विभाग, क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ कार्यालय, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग, आकाशचिन्ह या विभागांमधील अधिकारी यांनी सादर केला आहे.निवडणुकीच्या तोंडावर शहरातील वाहतूक कोंडीचा फोडण्यासाठी महापालिका व पोलिसांवर दबाव निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वारंवार प्रयत्न करूनही वाहतूक कोंडीत जागतिक स्तरावर पुण्याचा चौथा क्रमांक लागत आहे. टॉमटॉम या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, पुण्यात १० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ३३ मिनिटांचा वेळ लागत आहे. त्याचा परिणाम पुणेकरांवर होत आहे.महापालिकेने माहिती संकलित केली असता, त्यात रस्त्यातील अतिक्रमणे, गरजेपेक्षा मोठे पादचारी मार्ग, सायकल मार्ग, पडलेले खड्डे, ओबडधोबड पॅचवर्क यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे प्रमुख रस्त्यांवर हातगाड्या, पथारी, स्टॉलचे अतिक्रमण, पादचारी मार्गांवर झालेले अतिक्रमण, अवैध बांधकाम यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तेथील जुजबी कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमणे थाटली जात असल्याने कोंडी होत आहे.

