शंकराचार्य पीठाने आरोपी चैतन्यानंदशी संबंध तोडले
नवी दिल्ली:दिल्लीतील वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट-रिसर्चमध्ये अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप स्वामी चैतन्यनंद सरस्वती ऊर्फ पार्थसारथी यांच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीने विद्यार्थ्यांना धमक्या देऊन, अश्लील संदेश पाठवून आणि परदेश प्रवासाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने विशेषतः ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग) कोट्याअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना लक्ष्य केले.
२००९ व २०१६ मध्येही आरोपीविरुद्ध लैंगिक छळाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर यावेळी ऑगस्ट २०२५ मध्ये नवीन एफआयआर दाखल करण्यात आला.पोलिस तपासानुसार तीन महिला वॉर्डन आणि प्राध्यापकही आरोपीस मदत करत होते. ते विद्यार्थिनींवर त्यांच्या चॅट्स डिलीट करण्यास दबाव आणत आणि त्यांना गप्प राहण्यास सांगत असते. पोलिसांनी ३२ विद्यार्थीनींचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी १७ जणांनी स्पष्ट आरोप केले आहेत.
काही विद्यार्थिनींना परदेश दौऱ्याचे आमिष
पोलिस तपासात असे दिसून आले आहे की स्वामी चैतन्यानंद सरस्वतीने धमकी आणि प्रलोभनाची रणनीती वापरली. तो वारंवार सोशल मीडिया आणि एसएमएसद्वारे अश्लील संदेश पाठवत असे. त्याचे संदेश असे असत की, “माझ्या खोलीत या, मी तुम्हाला परदेशात घेऊन जाईन. तुम्हाला काहीही खर्च करावा लागणार नाही. तुम्ही माझे ऐकले नाही तर मी तुम्हाला परीक्षेत नापास करेन.’ आरोपी रात्री विद्यार्थीनींना त्याच्या खोलीत बोलावत असे आणि नकार दिल्यास त्यांना कमी गुण देण्याची धमकी देत असे. ईडब्ल्यूएस कोट्याखाली शिकणाऱ्या विद्यार्थीनींना लक्ष्य केले जात असे. कारण ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते आणि शिष्यवृत्तीवर होते. पोलिसांनी सांगितले की ३२ विद्यार्थीनींचे जबाब घेतले. त्यापैकी १७ जणींनी थेट लैंगिक छळ व मानसिक छळाची तक्रार केली. आतापर्यंत १६ विद्यार्थ्यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर आपले जबाब नोंदवले आहेत.
या गंभीर प्रकरणाच्या उजेडात आल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कर्नाटकातील शृंगेरी येथील श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम दक्षिणाम्नय श्री शारदा पीठाने आरोपींशी संबंध तोडले आहेत. संस्थेने एक सार्वजनिक निवेदन जारी करून म्हटले आहे की स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी हे त्यांच्या संस्थेचे प्रतिनिधी नाहीत.
बनावट डिप्लोमॅटिक नंबरची कार जप्त, दुसरा एफआयआर दाखल:तपासात पोलिसांनी असंख्य डिजिटल पुरावे गोळा केले आहेत. ५० हून अधिक मोबाईल फोन स्कॅन केले आहेत. त्यापैकी बरेच मोबाईल विद्यार्थीनींनी आरोपीच्या दबावाखाली डिलीट केले होते. या प्रक्रियेत तीन महिला वॉर्डन आणि प्राध्यापकांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा राहू नये यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात होता.

