पुणे – मुंबई आयआयटीतील एका प्रतिष्ठित प्राध्यापकाचे नाव वापरून, शासनाच्या एआय आणि ड्रोन प्रकल्पांचे आमिष दाखवून एका प्रसिद्ध अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या प्रमुखाची २ कोटी ४६ लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोराला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून मोठी रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सितैया किलारु (वय ३४, रा. हैदराबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ६ सप्टेंबर २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित शिक्षण संस्थेच्या प्रमुखाला आरोपीने वारंवार ईमेल आणि व्हॉट्सॲप कॉल करून दिशाभूल केली. मुंबई आयआयटीच्या प्राध्यापकाचे नाव वापरून त्याने शासनाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभाग देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले.
या गुन्ह्याचा तपास सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीची ओळख पटली. तांत्रिक तपासामध्ये आरोपी हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, तपास पथकाने तात्काळ हैदराबादला धाव घेतली. साईनगर, प्रगतीनगर, निजामपेठ, गच्चीबावली आणि याप्रल यांसारख्या विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर, पोलिसांनी याप्रल येथे सापळा रचून सितैया किलारुला शिताफीने अटक केली.
चौकशीदरम्यान आरोपीनेच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे कबूल केले. त्याच्याकडून १० डेबिट कार्ड्स, १३ पासबुक, १५ चेकबुक, ५ सिम कार्ड्स, सोन्याच्या खरेदीच्या पावत्या, इतर महत्त्वाची कागदपत्रे आणि ७० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन, एक टॅब, एक लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, त्याच्याकडून १ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ४० लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा कार आणि ८ लाख रुपयांची किया सोनेट कारही जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ४९ लाख ७५ हजार रुपये आहे.
न्यायालयाने आरोपीला २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, जेणेकरून या प्रकरणाचा अधिक तपास करता येईल. या घटनेमुळे सायबर फसवणुकीच्या धोक्यांबद्दल पुन्हा एकदा जागरूकता निर्माण झाली आहे.

