पुणे : अंमली पदार्थांविरोधात एकत्रितपणे लढा देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून यंदाची बहुचर्चित ‘आपलं पुणे’ मॅरेथॉन जागतिक स्वरूपात झळकणार आहे. पुण्याच्या अद्वितीय मॅरेथॉन परंपरेला पुढे नेण्यासाठी ‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन २०२५’ ही स्पर्धा १२ ऑक्टोबर रोजी रविवारी पहाटे चारपासून (प्रत्येक गटानुसार) श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथून सुरू होणार आहे.
या मॅरेथॉनमध्ये सुमारे १०,००० धावपटूंचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामध्ये नामवंत आंतरराष्ट्रीय धावपटू, देशभरातील धावपटू, रनिंग ग्रुप, कॉर्पोरेट संघ, लष्कर, पोलिस कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचा आणि फिटनेसप्रेमींचा समावेश आहे. ही स्पर्धा लोहा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आली असून, पंचशील रियल्टी हे मुख्य प्रायोजक आहेत. यंदा विजेत्यांना एकूण १९.५३ लाख रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहेत. ही पारितोषिके नामांकित खेळाडूंना; तसेच विविध वयोगटातील विजेत्यांना देण्यात येणार आहेत. पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखान्याच्या आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली, यावेळी लोहा फाउंडेशन’चे सचिव आणि आयोजक रवींद्र वाणी,लोहा फाउंडेशनच्या अध्यक्षा संजना लाल,सहाय्यक पोलिस आयुक्त,पुणे श्री.साईनाथ ठोंबरे, आयर्न मॅन डॉ. कौस्तुभ राडकर उपस्थित होते.
‘Say No to Drugs, Say Yes to Run’ या परंपरेला पुढे घेऊन जाऊन ‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन’ समाजात अमली पदार्थमुक्त जीवनशैलीचा प्रसार करणार असून, आरोग्य, फिटनेस आणि सकारात्मकतेची संस्कृती रुजवण्याचा संदेश देणार आहे, असे संयोजकांनी नमूद केले.
‘लोहा फाउंडेशन’चे सचिव आणि आयोजक रवींद्र वाणी म्हणाले, की “पुण्यात आधीपासूनच धावण्याची संस्कृती आहे. यंदाचा आंतरराष्ट्रीय दर्जाची ही स्पर्धा म्हणजे धावण्याच्या परंपरेचा आणि संस्कृतीचा गौरव आहे. पुणे वर्ल्ड मॅरेथॉन शहराला जागतिक व्यासपीठावर नेईल आणि संपूर्ण समाजाला अमली पदार्थांविरोधात एकत्रित करण्यास आणि निरोगी जीवनशैलीकडे घेऊन जाण्यास मदत करील.”
लोहा फाउंडेशनच्या अध्यक्षा संजना लाल म्हणाल्या, की ‘मॅरेथॉन म्हणजे फक्त धावणे नाही. फिटनेसचा सण साजरा करताना आपली सामाजिक जबाबदारीही ओळखली पाहिजे. मुलांचे आरोग्य आणि शिक्षणात गुंतवणूक करून आपण समाजाचे देणे फेडण्यासारखे आहे.’
मार्ग
‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन’ची सुरुवात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथून होईल. त्यानंतर धावपटू राधा चौकातून बाणेर रोडने साई हाउलँडकडे जाऊन बालेवाडी हाय स्ट्रीट – दसरा चौक या मार्गाने धावतील. त्यानंतर धावपटू औंध–बाणेर लिंक रोड – बाबासाहेब आंबेडकर पूल – नवीन डीपी रोड – कास्पटे चौक – बीआरटी मार्ग – जगताप फेरीलँड– डांगे चौक – पुनावळे चौक – संत तुकाराम महाराज पूल – आदर्शनगर बीआरटी – निगडी ब्रिज असा प्रवास करून पुन्हा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे परततील.
इच्छुक नोंदणीसाठी http://www.puneworldmarathon.com/ या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात.

