पुणे- गणेश पेठ मच्छी मार्केटमधील मासे व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुलीप्रकरणी फरासखाना पोलिसांनी बंडू आंदेकर टोळीच्या चार सदस्यांना अटक केली आहे. शेखर दत्तात्रय अंकुश, मनिष वर्धेकर, सागर बाळकृष्ण थोपटे आणि रोहित सुधाकर बहादुरकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली हिलाही आरोपी करण्यात आले आहे.टोळीने मागील 12 वर्षांत व्यापाऱ्यांकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली 20 कोटींहून अधिक रकमेची वसुली केली आहे. प्रत्येक व्यापाऱ्याकडून 15 ते 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जात होती. या प्रकरणी 60-65 व्यापाऱ्यांनी आतापर्यंत तक्रारी नोंदवल्या आहेत.
पोलिसांनी आंदेकर टोळीविरुद्ध खंडणी, जीवे मारण्याची धमकी, संघटित गुन्हे आणि संगनमताने गुन्हे करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. टोळीच्या अतिक्रमणावर पालिकेच्या मदतीने कारवाई सुरू आहे.टोळीच्या चौकशीदरम्यान कोट्यवधींची मालमत्ता आढळली आहे. मात्र, त्यांनी कधीही आयकर भरलेला नाही. याबाबत पुणे पोलिसांनी आयकर विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. वनराज आंदेकर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड यांच्या अवैध मालमत्तेवरही कारवाई होणार आहे.
आंदेकर टोळीकडे करण्यात आलेल्या चौकशीत व घर झडतीत कोट्यवधींची मालमत्ता सापडली आहे. परंतु, आजतागायत त्यांनी एकदाही इन्कम टॅक्स भरलेला नाही. एकदाही इन्कम टॅक्स न भरता कोणी एवढी माया कशी जमवू शकते? ही बाब निदर्शनास आल्यानंतर इन्कम टॅक्सच्या कारवाईच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी आयकर विभागाशी पत्र व्यवहार केला असल्याचे सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.
एकीकडे आंदेकर टोळीवर सर्वच प्रकारे कारवाई सुरू असताना दुसरीकडे वनराज आंदेकर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या अवैध मालमत्तेवरही अशाच पध्दतीने कारवाई केली जाणार आहे. त्यामध्ये गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड या टोळीशी संबंधीत सर्वावर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असून त्यांच्याही अवैध मालमत्ता लक्ष केल्या जाणार आहेत.

