पुणे, दि. २४ सप्टेंबर: सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील शेतरस्त्यांबाबतचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याकरिता तहसिल कार्यालय जुन्नर येथे महसूल लोक अदालत व रस्ता अदालत आयोजित करण्यात आली, यामध्ये शेतरस्त्यांबाबत एकूण १०४ प्राप्त प्रकरणापैकी १९ प्रकरणे जागेवरच निकाली काढण्यात आली, यामध्ये मौजे भोरवाडी (हिवरे बु) येथील गेल्या पंधरावर्षावासून रस्त्याबाबतचा असलेला वाद संपुष्टात आला असल्याची माहिती माहिती तहसीलदार सुनील शेळके यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमात जुन्नर तालुक्यातील १८५ गावामध्ये शिव, पाणंद वहिवाटीच्या रस्त्यांबाबत शिवारफेरी काढून ग्रामस्तरीय समिती समन्वयातून रस्त्यांचे युध्द पातळीवर सर्वेक्षण आले आहे. त्यामध्ये नकाशावर नोंद असलेल्या व नसलेल्या रस्त्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून ग्रामसभेमध्ये त्यास मंजूरी घेण्यात आली आहे. तालुक्यातील नकाशावर असलेले व नसलेल्या अंदाजे २ हजार ९८६ रस्त्यांना विशेष सांकेतांक क्रमांक देण्यात आले आहेत.
या १८५ गावांपैकी १५ गावांपैकी बोरी बु गावामध्ये रस्त्यांचे सीमांकन करणेत येऊन जीआयएस पध्दतीने गाव नकाशावर चिन्हांकित करण्यात आले आहेत, उर्वरित राजुरी, पिंपरीकावळ, वैशाखखेडे, पिंपळगाव त नारायणगाव, खानापुर, राळेगण, मंगरुळ, अलदरे, गायमुखवाडी, सितेवाडी, चावंड, मांजरवाडी, कुमशेत, कुसुर या १४ गावांतील रस्त्यांच्या याद्या आणि त्यानुसार ग्रामपंचायतीच्या ठरावासह रस्ते सीमांकन व जीआएस पध्दतीने गाव नकाशावर नोंद घेण्याकरिता उपअधिक्षक भूमी अभिलेख जुन्नर यांना कळविण्यात आले आहे, असेही श्री. शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
चौकट मौजे भोरवाडी (हिवरे बु) येथील आपापसातील खातेफोड, वाटपाबाबत ‘शेरताटी ते वनदेवी ‘ ह्या रस्त्याबाबत गेली १५ वर्षांपासून सुरू असलेला वाद महसूल लोक अदालतीत संपुष्टात आला. सेवा पंधरवडा उपक्रमात रस्त्याबाबतचे वादविवाद संपुष्टात आणून शेतकऱ्यांच्या जीवनमान सुखकर व्हावे, पर्यायाने ग्रामीण अर्थकारणात वद्धी व्हावी, यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे.

