पुणे: मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगावशेरी, धानोरी, पोरवाल रोड खराडी खांदवे नगर परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना रस्त्यांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
पाहणी दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. “वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी विविध माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे,” असे पठारे यांनी सांगितले.
यात पुढील रस्ते व संबंधित सुधारणांबाबत सूचना देण्यात आल्या. धानोरी येथील धानोरी गावठाण चऱ्होली जोड रस्ता, भारत माता रस्ता, मंत्रा मोटोना सोसायटी जवळील रस्ता, या तीनही रस्त्यांचे अंदाजपत्रक करणे, वडगावशेरी येथील जुना मुंढवा रस्ता ते वडगाव शेरी भाजी मंडई रस्त्याचे बांधकाम विभागाकडून मार्किंग करून पथ विभागाने पुढील कार्यवाही करणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते (रामवाडी) नगर रस्ता, खराडी शिवणे रस्त्यातील वडगावशेरी येथील स.न.५७ मधील वन विभागाच्या हद्दीतील प्रलंबित रस्त्याबाबत वनविभागाकडे पाठपुरावा करणे, खराडी येथील खराडी बायपास हडपसर रस्ता (प्रेस्टीज कंपनी येथे युवानकडून येणाऱ्या रस्त्याला ये जा करण्यासाठी सुरू करणे, खराडी बायपास रस्ता ते रेडिसन हॉटेल शेजारून सातव वस्ती, निर्मला शाळेकडे जाणारा रस्ता सुरू करणे, पीपीपी तत्त्वावर सुरू असलेल्या रस्त्यांवर मुख्य चौकामध्ये चॅम्पर करणे, खराडी जकात नाका येथे जोडणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करणे, खांदवेनगरकडे नगर रस्त्यापासून जाणारा मुख्य रस्ता करणे, खराडी जकात नाका ते ग्रँड रोडला आवश्यक ठिकाणी मुख्य चौकात चॅम्पर करणे, खराडी मुंढवा पूल नदी किनारचा रस्ता व त्याला जोडणारे रस्ते करणे.
“उद्या धानोरी–चऱ्होली फॉरेस्ट पार्क परिसरातील ३२० मीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या परवानगीसाठी वनविभागाशी सातत्याने पाठपुरावा केला होता. काल वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्याचा निर्णय झाला. अखेरीस वनविभागाची परवानगी मिळाली असून, वनविभागाच्या या जागेचा मोबदला म्हणून पुणे महानगरपालिकेने १६ लाख ८० हजार रुपये वनविभागास अदा केल्याचे पठारे यांनी स्पष्ट केले.
या पाहणीवेळी महापालिका पथ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव, उपअभियंता पुनम गायकवाड, सायली सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता सुशिल मोहिते, सारंग देवरे, मनोहर माळी, बांधकाम विभागाचे अभियंता उमेश घाडगे, उपअभियंता प्रशांत महिंद्रकर, कनिष्ठ अभियंता भुषण कोकाटे आदी अधिकारी उपस्थित होते.

