यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी ठरली जीवनरेखा
पुणे, दि. १९, : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील करण गजानन ठाकरे या तरूणाचे वैद्यकीय कारणास्तव यकृत निकामी झाले होते. गेली दोन वर्षांपासून तो या आजराशी झुंज देत होता. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय डॉक्टरांनी सांगितल्याने उपचारासाठी लागणारा ३० लाख रुपये खर्च करणे शक्य नव्हते. घरची परिस्थिती बेताची असल्याने इतका मोठा निधी उभारण्याचे प्रश्नचिन्ह त्याच्या कुटूंबियांसमोर होते. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांनी ठाकरे यांच्या उपचाराचा मोठा खर्च उचलला. ३० लाख रुपयांपैकी कुटुंबीयांनी ५ लाख रुपये उभारले, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपये तर उर्वरित २३ लाख रुपये धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून उपलब्ध करून देण्यात आले.
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात नुकतीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून करण सध्या प्रकृतीस स्थिर आहे. वर्धा येथील ठाकरे यांना वडील नसल्याने घरची परिस्थिती बिकट आहे. त्यातच त्याच्या आईला पक्षाघात झाला आहे. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी करणच्या खांद्यावर होती. अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच तो घरखर्चही भागवत होता. या विचित्र अशा परिस्थितीत डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले.त्यामुळे शस्त्रक्रियेचा प्रचंड खर्चाचा प्रश्न उभा राहिला होता.
या अशा बिकट परिस्थितीत करण यांचा मावसभाऊ चैतन्य बगाडे (वय २४, पुणे) यकृत दान करण्यासाठी पुढे आले. त्यांनी आपल्या यकृताचा भाग दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रत्यारोपणासाठी मार्ग मोकळा झाला.या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तातडीने पुढाकार घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि त्वरेने निर्णय होऊन उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध झाली.
या प्रकरणातून मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांची तत्परता आणि मावसभाऊचा त्याग या त्रिसूत्रीमुळे माझ्या भावाचा जीव वाचला अशी भावना गजानन यांची बहिणी अश्विनीने व्यक्त केली.
जिल्हास्तरीय समिती व पुण्यातील धर्मादाय रुग्णालये
पुणे जिल्ह्यातील एकूण ५८ धर्मादाय रुग्णालयांतून निर्धन व दुर्बल रुग्णांना लाभ मिळत आहे. या रुग्णालयांना शासनाच्या विविध कर व अनुदान सवलती मिळतात. त्यामुळे गरीब रुग्णांसाठी आरक्षित खाटा उपलब्ध करून देणे त्यांच्यावर कायद्याने बंधनकारक आहे.
निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दराने उपचार मिळावेत, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समितीमार्फत धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटांची माहिती ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते आणि त्यावर राज्यस्तरीय मदत कक्ष सतत देखरेख ठेवतो.
वैद्यकीय मदतीसाठी अर्ज कसा करावा?
रुग्णांना मदत मिळण्यासाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाकडे विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो.
आवश्यक कागदपत्रे :
• रुग्णाचे आधारकार्ड
• शिधापत्रिका
• पॅनकार्ड
• उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांच्याकडून)
• रुग्णालयाने दिलेले उपचाराचे अंदाजपत्रक
कुठे संपर्क साधावा?
डॉ. मानसिंग साबळे,
अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
पत्ता: खोली क्रमांक १०, तळमजला, जुनी जिल्हा परिषद, पुणे
वैद्यकीय मदतीचा अर्ज भरण्यासंदर्भात अडचण आल्यास कक्ष प्रमुखांच्या ८०८७६७८९७७ या भ्रमणध्वनी टोल-फ्री हेल्पलाईन १८०० १२३ २२११क्रमांक, https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच cmrfpune@gmail.com ईमेल पत्त्यावर क्रमांकावर संपर्क साधावा.

