छत्रपती संभाजीनगर |
छावणी परिसरातील एका बालगृहातून नऊ मुली पळून गेल्याच्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भगवान बाबा बालिका आश्रम आणि सावली बालगृहास भेट देऊन मुलींच्या सुरक्षिततेची पाहणी केली तसेच त्यांच्या भावना, आवडीनिवडी आणि स्वप्नांविषयी संवाद साधला.
डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाला मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस सुधारात्मक पावले उचलण्याचे आदेश दिले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना ‘अँटी-ट्रॅफिकिंग’ संदर्भातील माहिती संकलित करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत मुलींच्या सुरक्षेसाठी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.
मुलींशी झालेल्या संवादादरम्यान डॉ. गोऱ्हे भावूक होत म्हणाल्या, “या मुलींना भेटून मला पुन्हा आई झाल्यासारखं वाटलं.” तर मंत्री तटकरे यांनी मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधला. काही मुलींनी आयएएस अधिकारी आणि आर्मीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली, तर काहींनी हस्तकला व कौशल्यविकास शिकण्याची मागणी केली. दोन्ही मान्यवरांनी त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देत त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या भेटीदरम्यान मुलींनी स्वतः बनवलेल्या पेंटिंग्स आणि क्राफ्ट्स दाखवले. मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. यावेळी मुलींनी महिला व बालविकास विभाग आयोजित बालमहोत्सवात वाचन, खेळ आणि सर्जनशील उपक्रमांचा समावेश वाढवण्याची मागणी केली.
या दौऱ्यात पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश पुंगळे, तसेच भगवान बाबा बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
या दौऱ्यातून प्रशासनाने मुलींच्या सुरक्षिततेबाबत अधिक संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पावले उचलावीत, तसेच मुलींच्या शिक्षण, कला आणि कौशल्यविकासाला प्रोत्साहन द्यावे, असा ठोस संदेश देण्यात आला.

