पुणे :- पुणे शहरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून धो-धो पाऊस पडत आहे. यामुळे पुणेकरांच्या दारात व शहरातील रस्त्यांवर मुबलक पाणी दिसत आहे. पण याला पुणे शहरातील कोंढवा बुद्रुक परिसरातील ग्रामस्थ अपवाद ठरले आहेत. कारण भर पावसाळ्यातही कोंढव्यातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. परिणामी दारात मुबलक पाणी, पण घरात पाण्याअभावी घशाला कोरड अशी अवस्था कोंढवा बुद्रुक ग्रामस्थांची झाली आहे. याला महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग कारणीभूत ठरला आहे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाण्यामुळे संतप्त आंदोलकांनी शुक्रवारी (दि.१९ सप्टेंबर) पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले.यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालींदर कामठे, माऊली कामठे, शिरीष धर्मावत, गणेश कामठे, रोहन कामठे, अमित कामठे, पहिलवान सागर कामठे, सोमनाथ कामठे,अमर कामठे,भरत पांगारे, अनिल कामठे, योगेश कामठे, सुशांत पंडित, संजय चव्हाण, किशोर आतकिरे, रुपेश मोघेल, अनिकेत मेमाणे, किशोर मरळ आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शहरातील कोंढवा बुद्रुक परिसरातील कोंढवा बुद्रुक गावठाण, श्रद्धानगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर, लक्ष्मीनगर, कामठेनगर येथील ग्रामस्थांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांना बसत आहे. या पाणी समस्येबाबत अनेकदा तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने कोंढवा बुद्रुक ग्रामस्थ आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोंढवा व परिसरातील विविध भागात पुरेशा प्रमाणात आणि वेळेत पाणी मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी यावेळी घेतली. वारंवार होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या गैरव्यवस्थेमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाची दखल घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा केली आणि लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र तोपर्यंत आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला .

