पुणे दि. : मौजे वेहेरगाव, कार्ला (ता. मावळ) येथील श्री. एकविरा देवी नवरात्र उत्सव २०२५ (दि. २२ सप्टेंबर ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५) दरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व सुरळीत वाहतूक व्हावी यासाठी मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह विभागाचे दि. १९/०५/१९९० चे अधिसूचनेन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
दि. २२ सप्टेंबर २०२५ ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कार्ला फाटा ते श्री. एकविरा देवी पायथा मंदिर या मार्गावर अवजड व मोठ्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.
दि. २७ सप्टेंबर २०२५ ते दि. ०१ ऑक्टोबर २०२५ सकाळी ०६.०० ते रात्री २२.०० या वेळेत जुना मुंबई–पुणे व पुणे–मुंबई महामार्गावरील कुसगाव बुद्रुक टोलनाका लोणावळा ते वडगाव फाटा वडगाव मावळ या दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.
जुना मुंबई–पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाणारी जड व अवजड वाहने ही लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक टोलनाका मार्गे एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाक्यामार्गे पुणे शहराकडे वळविण्यात येतील.
पुणे–मुंबईकडे जाणारी जड व अवजड वाहने ही वडगाव येथील तळेगाव फाटा मार्गे उर्से खिंडीतून एक्सप्रेस हायवेने मुंबईकडे वळविण्यात येतील.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी नागरिकांनी व वाहनचालकांनी वरील आदेशांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.

