सोनाली आंदेकर येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होत्या. निवडणुकीसाठी तयारीही सुरू झाल्याची माहिती होती. मात्र, या खूनप्रकरणात तिचे नाव पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे
पुणे-आयुष कोमाकर खून प्रकरणात चौकशीसाठी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकरला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना प्रतिकार करणाऱ्या प्रियांका आंदेकर यांच्यासह १३ जणांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील फौजदार प्रियांका गोरे यांनी फिर्याद नोंदविली आहे दरम्यान हा सर्व विरोध मोडून त्यांनी सोनाली आंदेकरला अटक केली त्यानंतर सोनालीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
फौजदार प्रियांका गोरे यांच्या तक्रारीवरून सोनाली वनराज आंदेकर (वय ३६, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) हिच्यासह प्रियंका कृष्णराज आंदेकर, माया देवळे, येल्लबाबाई कित्तुरकर, लक्ष्मीबाई बेडगिरी, संगीता शिंदे, शारदा साळुंखे, बेबी दोडके, सरुबाई निसारे, कल्पना शिंदे, पूजा शिंदे, स्वाती दोडके आणि मोहन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुष कोमाकर हा सोनाली आणि प्रियंका आंदेकर यांचा भाचा होता. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. कौटुंबिक वाद आणि टोळीयुद्धातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह १५ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. कोमाकरच्या खुनापूर्वी आरोपींची वानवडी परिसरात एकत्रित बैठक झाली होती आणि ते एकमेकांना मोबाइल घरी ठेवून भेटत होते.
या खून प्रकरणात सोनाली आणि प्रियंका यांची यापूर्वी चौकशी करण्यात आली होती. तपासात सोनाली खून प्रकरणाचा कट रचण्यात सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला गुरुवारी (१८ सप्टेंबर) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी सोनाली आणि प्रियंका यांना ताब्यात घेण्यापासून पोलिसांना रोखण्यात आले. पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याने सोनाली आणि प्रियंका आंदेकरसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस फौजदार संतोषी जाधव (8554918025) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

