पुणे- बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज घेऊन आयसीआयसीआय बँकेची ५.२७ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय प्रमुख अर्जुन अथोली (वय ३९) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यानुसार मोहम्मद युनुस शरीफ शेख आणि दरिऊस सोलोमन राफत या दोन आरोपींविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), ४६७, ४६८ (खोटे दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवजांचा वापर करणे) आणि १२० (ब) (गुन्हेगारी कट रचणे) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जुलै २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडला. आरोपी मोहम्मद शेख आणि दरिऊस राफत यांनी आयसीआयसीआय बँकेकडे गृहकर्जासाठी अर्ज केला होता. त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून ती खरी असल्याचे भासवले आणि बँक अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला.
मोहम्मद शेखने मागील तीन वर्षांचे आयकर विवरणपत्र आणि जमीन खरेदीबाबतची बनावट कागदपत्रे बँकेला दिली होती. या आधारे बँकेने त्याला १४ जुलै २०२३ रोजी पाच कोटी रुपयांचे गृहकर्ज मंजूर केले. ३० सप्टेंबर २०२३ रोजी ही रक्कम पुण्यातील सोपानबाग येथील मालमत्तेचे मालक दरिऊस राफत यांच्या नावाने चेकद्वारे देण्यात आली. मात्र, नंतर ही मालमत्ता प्रेम फतेचंद वजरानी यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले.
सुरुवातीला काही महिने युनुस शेखने कर्जाचे हप्ते भरले, परंतु मार्च २०२४ पासून त्याने हप्ते भरणे बंद केले. बँकेचे वसुली अधिकारी तपासणीसाठी गेले असता, त्यांना संबंधित मालमत्ता दुसऱ्याच्याच नावावर असल्याचे आढळले. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याचे भासवून कर्ज घेतल्याचे समोर आले.
सदर मालमत्तेची मालकी प्रेम फतेचंद वजरानी यांची असून, त्यात दोन्ही आरोपींचा कोणताही हक्क नाही. चौकशीदरम्यान, शेखने १९८७ सालातील एका डीडच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती खरी असल्याचे भासवून हा आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. फरासखाना पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

