पुणे, : तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि नवोन्मेषाचा भव्य उत्सव म्हणून रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियन येत्या २० आणि २१ सप्टेंबर रोजी पुण्यातील MIT-ADT विद्यापीठ, लोणी काळभोर येथे रंगणार आहे. देशभरातून ७ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि ५०० हून अधिक रोबोट्सच्या सहभागाने ही स्पर्धा यंदा ऐतिहासिक ठरणार आहे. शासकीय शाळा, खाजगी संस्था तसेच वंचित समाजघटकातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, यावर्षीच्या स्पर्धेत ग्रामीण आणि आदिवासी भागातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सहभागी होत असल्याने STEM आणि रोबोटिक्स शिक्षणाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक व्यासपीठ मिळाले आहे.
दोन दिवसीय या महोत्सवात लाईन फॉलोअर, मेझ सॉल्व्हर, मिनी सुमो, ड्रोन एव्हिएशन, फोल्क रेस तसेच बहुचर्चित एंटरप्रेन्युअरशिप चॅलेंज अशा विविध रोमहर्षक स्पर्धांचा समावेश आहे. १२ लाख रुपयांपर्यंत पारितोषिक निधी असलेल्या या स्पर्धेत विजेत्यांना केवळ पदक आणि ट्रॉफीच नव्हे, तर युरोपातील एस्टोनियामध्ये होणाऱ्या २०२५ च्या रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
रोबोटेक्स इंडिया ही केवळ स्पर्धा नाही तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा उत्सव आहे. गाव, शहर, खेड्यातील मुले तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जेव्हा समस्यांचे निराकरण करतात, तेव्हा ‘विकसित भारत’ घडण्याचे दर्शन घडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर आणि डिजिटल भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून, ही स्पर्धा भारताच्या तरुण नवोन्मेषकांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचे काम करते,” असे रोबोटेक्स इंडियाच्या संचालिका पायल राजपाल यांनी सांगितले.
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे “Girls Who Build Robots” या उपक्रमाद्वारे हजारो मुलींना STEM क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

