पुणे, 18 सप्टेंबर २०२५ : कराड येथील एका दांपत्याला अपत्यप्राप्तीचे सुख मिळत नव्हते. त्यांना झालेली दोन बाळे जन्मानंतर काही दिवसांतच दगावली होती. या बाळांना आई–वडील दोघांकडूनही आलेल्या अनुवांशिक जनुकदोषामुळे गंभीर आजार झाला होता. मात्र अखेर पुण्यातील इंदिरा आयव्हीएफ येथे ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’च्या (आयव्हीएफ) उपचारांमुळे या दांपत्याला जनुकदोषमुक्त निरोगी बाळ प्राप्त झाले आहे.
लग्नाला दहा वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरीही या दांपत्याला अपत्यप्राप्ती होत नव्हती. त्यांच्यावर ‘स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी’ (एसएमए) या दुर्धर आजाराची छाया होती. हा आजार दोन्ही पालकांकडून पुढे सरकतो आणि अपत्याच्या जिवंत राहण्याच्या शक्यतांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अपत्यप्राप्तीमध्ये जोखीम घ्यावी लागणार हे स्पष्ट दिसत असले, तरी निरोगी अपत्य प्राप्त करण्याची या दांपत्याची जिद्द कायम होती. वैज्ञानिक आणि वैद्यकीय प्रगतीने या अडचणीवर मार्ग निघाला. जनुकीय तपासणी, गुणवत्ता नियंत्रणाचे प्रोटोकॉल्स आणि सततचे वैद्यकीय मूल्यमापन यांवर आधारित खास तयार केलेल्या उपचारयोजनेमुळे या दांपत्याने अशक्य वाटणाऱ्या अडथळ्यांवर मात केली.
इंदिरा आयव्हीएफ येथील आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. अमोल सुभाष लुंकड म्हणाले, “एसएमएसारख्या जनुकदोषातून मार्ग काढणे म्हणजे केवळ वंध्यत्वावर उपचार करणे नसते, तर व्यापक उपचारयोजना, काटेकोर वैद्यकीय देखरेख आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन त्यामध्ये गरजेचे असते. आम्ही जनुकीय तपासण्या केल्या आणि रुग्णांना विश्वासात घेतले. त्यातून पालकत्वाकडे आत्मविश्वासाने जाणारा मार्ग उभा राहिला.”
या उपचारांमध्ये यशाची शक्यता वाढवण्यासाठी टप्प्याटप्प्याने योजना आखण्यात आली :
· दांपत्याचा वैद्यकीय इतिहास तपासून, त्यांना त्यांच्या अनुवांशिक आजाराची, त्यातील चाचण्यांची माहिती दिली, जोखीम सांगितली आणि समुपदेशन केले,
· अंडाशय सक्रियतेची पद्धत वापरून आयव्हीएफ पद्धतीने अंड्यांची वाढ तपासली,
· प्रयोगशाळेत भ्रूण तयार करून त्याची जनुकीय तपासणी केली आणि दोष निर्माण होऊ शकणारे भ्रूण वगळले,
· निरोगी भ्रूणाची निवड करून गर्भाशयात प्रत्यारोपण करणे आणि पुढील देखरेख सुरू केली.
या उपचारांनंतर रुग्णाला गर्भधारणा झाली आणि निरोगी, जनुकदोषमुक्त बाळाचा जन्म झाला. अनेक वर्षांची झुंज संपली आणि तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
आयव्हीएफचे उपचार, जनुकीय तपासणी आणि सातत्यपूर्ण देखरेख यांचा संगम झाल्यास, जनुकदोषाचा धोका असलेल्या दांपत्यांनाही पालकत्वाचा सुरक्षित व विश्वासार्ह मार्ग उपलब्ध होऊ शकतो, हे या अनुभवावरून दिसून येते.

