-दानवीर, धर्मवीर कर्मवीर म्हणविणारे देखील जाळ्यात ? प्रमोद रांका प्रकरणाचा तपास ED कडे
पुण्यातील ख्यातनाम लोकांच्या कंपन्यांवर आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर आता सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने याची चौकशी आपल्या हाती घेतली आहे.दिल्लीमधे स्पेशल कनेक्शन्स तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील घनिष्ट संबंध असल्याचे सांगणारे पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर प्रमोद रांका यांच्या गैरव्यवहारांचा तपास ED कडे देण्यात आला आहे. रांका यांच्यासह पुणे शहरातील 4 बडे बिल्डर ED च्या रडारवर असून या सगळ्यांनी मिळून केलेले गैरव्यवहार आता उघडकीस आले आहेत. काही सेवानिवृत्त उच्चपदस्थ अधिकारी देखील या गैरव्यवहारात सहभागी आहेत, त्यांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे वृत्त ‘मिरर’ने दिले आहे
रांका यांच्यासह साॅलिटायर ग्रुप, कोहिनूर डेव्हलपर्स आणि मित्तल बंधूंच्या कंपन्यांवर आयकर विभागाने टाकलेल्या मोठ्या छाप्यानंतर इडीने यासंदर्भातील चौकशी सुरू केली आहे. ‘सीविक मिरर’च्या संपादिका अर्चना मोरे यांनी या कारवाईची माहिती सर्वप्रथम प्रसिद्ध केली. यामुळे पुण्याच्या रियल इस्टेट क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिरर च्या वृत्तात असे म्हटले आहे कि,’ आयकर विभागाच्या चौकशीत काही नामांकित बांधकाम कंपन्या आणि सरकारी अधिकाऱ्यांमधील संदिग्ध संबंध उघड झाले असून यात येस बँक कर्ज घोटाळा आणि इंडियाबुल्स आर्थिक गैरव्यवहार यांचेही धागेदोरे गुंतले असल्याचे समोर आले आहे.प्रमोद रांका हे रिव्हरफ्रंट रिअॅल्टी पुणे, स्टारव्ह्यू हाउसिंग, प्रोमार्क प्रॉपर्टीज, एक्झर्बिया एपॉक क्रिएशन्स, एम्ब्लेम रिअॅल्टी, साक्षी शाह रिअॅल्टी, रांका गारमेंट्स आणि पार्श्वनाथ क्लोदिंग या कंपन्यांमध्ये भागीदार किंवा संचालक आहेत.ईडीचा तपास अजून सुरू आहे. मात्र प्राथमिक तपासात प्रमोद रांका हे या संपूर्ण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थगित प्रकल्प, टाउनशिप धोरणांचा गैरवापर आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांमुळे पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रसमोर विश्वासार्हतेचे मोठे संकट उभे ठाकले आहे.रांका यांनी वारंवार आपल्या राजकीय ओळखींचा दाखला दिल्याचे सांगितले जाते. त्यांनी स्वतःला दिल्लीतील उच्च पातळीवरील मंडळींशी, केंद्रीय गृहमंत्र्यांशी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असल्याचा दावा केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांचे नागपूरचे राज्यसभा खासदार अनिल संचेती यांच्याशीही संबंध असल्याचे बोलले जाते. या ओळखींचा त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी वापर झाला काय, याचा तपास सुरू आहे.
त्यांचा प्रभाव केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून राजकीय ओळखही मोठी आहे. त्यांच्या मेहुण्यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले असून त्यांचे संबंध डीएचएफएल घोटाळा तसेच इंडियाबुल्स प्रकरणाशी असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.
ईडीच्या तपासात एका जटील आर्थिक गैरव्यवहाराचे जाळे उघड झाले आहे. एका बिगर बँकिंग वित्तीय संस्थेतून मध्यपूर्वेतील फंडांकडे मोठ्या प्रमाणात निधी वळवण्यात आला. हा पैसा नंतर परदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली पुन्हा भारतात आणला गेला. त्यानंतर तो कॉर्पोरेट डिपॉझिट म्हणून दाखवून प्रत्यक्षात मुंबईतील लोअर परळमधील प्रकल्पांसह विविध मालमत्ता खरेदीसाठी वापरला गेला. याच संदर्भात व्हीटीपी रिअॅल्टी, गोदरेज प्रॉपर्टीज आणि ऑनेस्ट शेल्टर्स या कंपन्यांनी तब्बल शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कॉर्पोरेट डिपॉझिट्स घेतल्याचा संशय ईडीला आहे.
रांका यांचा साॅलिटायर ग्रुप, मित्तल बंधू आणि व्हीटीपी रिअॅल्टी यांच्यात मतभेद झाल्याने अनेक प्रकल्प अडकून पडले आहेत. यात मार्केट यार्डमधील साॅलिटेयर वर्ल्ड प्रकल्पाचाही समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेल्या घर खरेदी करणारे आणि भागधारकांना निधी परत मिळवण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. टाउनशिप धोरणांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला आहे. माण, हिंजवडी व मांजरी येथील प्रकल्प वेगवेगळ्या डेव्हलपर्समध्ये विभागले गेले आहेत. नियमांनुसार एका डेव्हलपरकडे पाणीपुरवठा, वीज, शाळा, अग्निशमन केंद्र यांसारखी पायाभूत सोयी पुरवण्याची जबाबदारी असते, मात्र हे नियम पाळले गेले नाही, असा आरोप आहे.ईडीच्या अधिकाऱ्यांच्या तपासात असे आढळल्याचे सांगितले जाते की, एका नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर पैसे मध्यपूर्वेतील एका कंपनीकडे वळवण्यात आले आणि त्यानंतर लगेचच थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांच्या आडोशाने हे पैसे भारतातील एका कंपनीकडे परत पाठवण्यात आले.पुढील चौकशीत हेही आढळले की त्याच भारतीय कंपनीने हे पैसे खोट्या ठेवी म्हणून दाखवून विविध मालमत्ता खरेदीसाठी वापरले, ज्यामध्ये मुंबईतील लोअर परळ परिसरातील एक प्रकल्प समाविष्ट आहे. चौकशीत असेही सुचवले गेले की व्हीटीपी रिअॅल्टी, गोदरेज प्राॅपर्टीज आणि ऑनेस्ट शेल्टर्स यांनी संगनमत केले आहे. त्यामुळे ईडीला मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहाराचा संशय आला आणि सर्व संबंधित कपन्यांवर छापे टाकण्यात आले.प्रमोद रांका, सॉलिटेअर ग्रुप, मित्तल ब्रदर्स आणि व्हीटीपी रिॲल्टी यांच्यात मोठा वाद झाला असल्याचे कळते. त्यामुळे या गटांच्या काही प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. यामध्ये मार्केट यार्ड येथील सॉलिटायर वर्ल्ड प्रकल्पाचा समावेश आहे, जिथे अनेक गुंतवणूकदार आणि हितसंबंधी अडकले आहेत. आपले पैसे परत मिळवण्यासाठी ते धावपळ करत आहेत.रांका यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सेवा दिलेल्या अनेक माजी मुख्य सचिवांचा प्रभावी वापर केला. त्यापैकी काही जण सेवानिवृत्तीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले जाते.प्रमोद रांका हे सॉलिटेअर ग्रुपचे भागीदार असून अनेक रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये ते डिझाईनेटेड पार्टनर आहेत. यामध्ये खालील कंपन्यांचा समावेश आहे.
रिव्हरफ्रंट रिअल्टी पुणे एलएलपी : ११ फेब्रुवारी २०११ पासून डिझाईनेटेड पार्टनर
स्टारव्ह्यू हाऊसिंग एलएलपी : १ एप्रिल २०१२ पासून डिझाईनेटेड पार्टनर
प्रोमार्क प्रॉपर्टीज एलएलपी : २४ जून २०१४ पासून डिझाईनेटेड पार्टनर
साक्षी शाह रिॲल्टी एलएलपी : २३ एप्रिल २०२४ पासून डिझाईनेटेड पार्टनर
एक्झर्बिया-एपॉक क्रिएशन्स एलएलपी : १२ जून २०१७ पासून पार्टनर
एम्ब्लेम रिॲल्टी एलएलपी : १५ ऑक्टोबर २०२३ पासून डिझाईनेटेड पार्टनर
रांका गारमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड : २५ नोव्हेंबर २००२ पासून संचालक

