मुंबई- पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या अटकेमुळे बांधकाम आणि उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अटकेपूर्वीच राजेंद्र लोढा यांनी लोढा ग्रुपच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता.मुंबई पोलिसांनी लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना वरळी परिसरातून अटक केली असून, कोर्टाने त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राजेंद्र लोढा यांच्यावर लोढा ग्रुपची 85 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, राजेंद्र लोढा यांनी लोढा ग्रुपचे सध्याचे संचालक आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाने आणखी वेगळे वळण घेतले आहे.
राजेंद्र लोढा यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अभिषेक लोढा यांच्याकडे एक हस्तकला पाठवून त्यांना धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपण ‘सुसाईड बॉम्बर’ असल्याचे सूचित करत, कारवाई झाल्यास अभिषेक लोढा यांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. राजेंद्र लोढा यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहण केल्याचा आणि लोढा ग्रुपचे काही फ्लॅट्स परस्पर विकल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्यांनी मोठी मालमत्ता जमा केली. यामुळे लोढा ग्रुपने त्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.
लोढा डेव्हलपर्सने यापूर्वीच जाहीर केले होते की राजेंद्र लोढा यांनी 17 ऑगस्ट 2025 पासून कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आणि त्यांच्या वर्तनाशी संबंधित काही बाबी कंपनीच्या नैतिकता समितीच्या निदर्शनास आल्या होत्या. याच कारणामुळे गेल्या महिन्यात त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

