मुंबई-देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची चिंता नाही तर भीती आहे.बेस्टच्या निवडणुकीत काय झाले हे मी आधीच सांगितले आहे. मुंबईतील बेस्ट डेपोसह संपूर्ण मुंबई फडणवीसांच्या पंखा खालील बिल्डरांनी ताब्यात घेतली आहे. मुंबईचे लोढा आणि कंबोजीकरण कसे झाले आहे हे मीडियाने समोर आणले पाहिजे.असे शिवसेना नेते आणि खासदार नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष यांनी ठाकरेंना मुंबईचा महापौर खान ला करायचे आहे अशी टीका काल केली या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले ,मुंबईचा महापौर हा मराठी आणि शिवसेनेचाच होईल. त्यांना जर खानांचा तिटकारा असेल तर त्यांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावे देवेंद्र फडणवीस यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे. त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान नाही. ते महाराष्ट्रात मोदी यांनी चिकटवलेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना इतिहास माहिती नाही..अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कुणी केले? आरिफ मोहम्मद खान यांना बिहारचे राज्यपाल कुणी केले, असे अनेक उदाहरण मला देता येतील. देशाच्या राजकीय-सामाजिक जडण- घडणीत आणि स्वातंत्र्य लढ्यात भाजप आणि आरएसएस नव्हता. पण मुस्लीम समाज सामाजिक चळवळ आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होता. त्यांनी हमीद दलवाई यांच्यासारख्या नेत्याचा देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करावा.
एकनाथ शिंदे यांनी जर काही बेकायदेशीर कामे केली असतील मुळातच ते स्वत:च बेकायदेशीर आहेत. सध्याच्या सरकारमधील त्यांचे उपमुख्यमंत्रिपद त्यांचा पक्ष आणि चिन्ह हे सर्व बेकायदेशीर आहे. असा बेकायदेशीर व्यक्ती कायदेशीर काम करेल यांची अपेक्षा महाराष्ट्राने ठेवू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. ते बेकायदेशीर व्यक्तीला मांडीवर घेऊन बसले आहेत.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, शहा, फडणवीस यांनी शिंदेंवर कारवाई केली पाहिजे. कोर्टाने सांगण्याची गरज नाही. असेही हे सरकार कोर्टाचे ऐकत नाही. ते त्यांच्या खिशात आहे. कोर्टाने आदेश दिले पाहिजे नगरविकास खात्याच्या मंत्र्यांवर कारवाई करा असे, संजय राऊत यांनी म्हटले आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, काल जो प्रकार झाला तो दुर्दैवी होता. त्यांचे आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही. समाजामध्ये काही माथेफिरु लोक असतात. देशभरात ते अशा स्मारकावर चुकीचे काम करत असतात. शिवसैनिकांनी स्मारकाचे शुद्धीकरण केले आहे. पोलिसांनी त्यासंदर्भात तपास करत एका व्यक्तीला अटक केली आहे. समाजात असेही माथेफिरू लोक असतात. ते कोणताही राग कुठेही काढतात. यावर राजकीय भांडवल न करता कारवाई केली पाहिजे.
संजय राऊत म्हणाले की, नगरविकास खाते हे पैसे खाण्याचे सर्वांत मोठे कुरण झाले आहे. एकनाथ शिंदे यांना जी आर्थिक सूज आली आहे ती नगरविकास खात्यामुळे आली आहे. हे कोर्ट आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही का? हिंमत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, नुसती निरीक्षणे नोंदवू नका.

