एकीकडे PM मोदींचा वाढदिवस शहरात धुमधडाक्यात साजरा होत असताना दुसरीकडे, घायवळ टोळीकडून गोळीबाराच्या घटनेने कोथरूड हादरलं
पुणे-गाडीला साईड दिली नाही म्हणून कोथरुड मधील शिंदे चाळीत गोळीबार करण्यात आला आहे.हा गोळीबार निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असून गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत. घायवळ टोळीतील मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. मध्यरात्री कोथरुड भागात ही घटना घडलीय आहे. प्रकाश दुरगुडे असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपींपैकी मयुर कुंभारेने गोळीबार केलेला आहे. तीन गोळ्या झाडल्यात. मानेला आणि मांडीला गोळी लागलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहनचालकाने घायवळ टोळीच्या गुंडाना पुढे जाण्यास साईड दिली नाही. याच कारणातून हे तिघे संतापले आणि त्यांनी कारमधील प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला. सुरुवातील तीन राऊंड फायर केल्याची माहिती मिळत होती. मात्र आता रात्री एकच राऊड फायरिंग केल्याचं सांगितलं जातंय. ही घटना कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरात घडली. या गोळीबारात प्रकाश धुमाळ जखमी झाले असून, त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. जखमीवर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची आता प्रकृती कशी आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र एकीकडे आंदेकर टोळीने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता घायवळ टोळीने गोळीबार केल्याने पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.कोथरूड परिसरात निलेश घायवळ गँगच्या सदस्यांनी केवळ रस्ता न दिल्याच्या किरकोळ वादातून फायरिंग करून दहशत माजवल्याने खळबळ उडाली आहे .
नीलेश बन्सीलाल घायवळ पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील असून तो उच्चशिक्षित देखील आहे. पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्याने मास्टर इन कॉमर्सची डिग्री पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या ऐवजी त्याने गुन्हेगारीचा रस्ता पकडला.नीलेश घायवळची पुण्यातील आणखी एक कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणेशी 2000 ते 2003 या काळात भेट झाली व ओळख वाढली. त्यानंतर दोघांनी मिळून एका खुनाची घटना घडवली आणि त्यासाठी 7 वर्षांची शिक्षा भोगली. जेलमध्ये शिक्षा भोगून आल्यानंतर नीलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्यात आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या कारणावरून वाद निर्माण झाले आणि मैत्रीचे नाते वैरात बदलले.नीलेश घायवळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणी वसुली मारामारी आणि परिसरात दहशत निर्माण करणे असे जवळपास 23 ते 24 गुन्हे पुण्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. कोथरूडच्या सुतारवाडीत तर नीलेश घायवळची चांगलीच दहशत होती. गजा मारणेच्या टोळीने नीलेशवर दोन वेळा जीवघेणे हल्ले केले होते. त्याला घायवळ टोळीने देखील चोख प्रत्युत्तर दिले होते. यात सर्वात चर्चेत असलेला गुन्हा म्हणजे दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची हत्या. कुडलेचा रस्त्यात पाठलाग करत फिल्मी स्टाइलने खून करण्यात आला होता. या घटनेनंतर नीलेश घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली.सचिन कुडले हत्येनंतर नीलेश घायवळ तुरुंगात होता. 2019 साली तुरुंगातून सुटला तसेच इतर खटल्यांमधूनही हळूहळू जामीन मिळवत 2023 मध्ये अखेर नीलेश पूर्णपणे तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर त्याने पुन्हा खंडणी, टोळीयुद्ध आणि विविध हिंसक गुन्हे करणे सुरू केल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या गल्लीबोळात नीलेश घायवळची बॉस म्हणून ओळख आहे.

